बीड : लोकसभा निवडणुकानंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध राजकीय पक्षांना आणि इच्छुक उमेदवारांनाही लागले आहेत. त्यामुळे, मतदारसंघातील इच्छुक उमेदवार राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यातच, यंदा राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी (NCP) या दोन मोठ्या पक्षात फूट पडल्यामुळे स्थानिक नेत्यांना संधी वाढल्या असल्या, तर महायुती व महाविकास आघाडी असा राजकीय सामना होणार असल्याने या संधींमध्ये स्पर्धाही असल्याचे दिसून येते. त्यातच, लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार (Sharad pawar) यांच्या पक्षाने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांसाठीही त्यांच्याकडे उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. विशेष म्हणजे, बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी 100 गावच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे स्टॅम्प पेपरवर उमेदवारीची मागणी केली आहे. 


सध्या राज्यात विधानसभेचे वेध लागले असून कुठल्याही क्षणी विधानसभा जाहीर होऊ शकते. बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी चक्क स्टॅम्प पेपरवर निष्ठा व्यक्त करत नारायण डक यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजलगाव विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच, पक्षासोबत गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊन उमेदवारी देऊ नये अशीही मागणी या स्टॅम्प पेपरवर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष नेमकं माजलगाव विधानसभा क्षेत्रामध्ये काय निर्णय घेतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.


प्रकाश सोळुंकेंनी गद्दारी केली


स्टॅम्प पेपरवरची मागणी म्हणजे ही जनभावना आहे आणि नक्कीच सुरुवातीपासून आम्ही शरद पवार पक्षाबरोबर राहिलेलो आहेत. माजलगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळुंके यांनी गद्दारी करून अजित पवार यांच्यासोबत गेले. मात्र, त्यांनी आता स्टंटबाजी सुरू केलेली आहे. प्रकाश सोळुंके यांनी निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे एक स्टंट असल्याचे मतही नारायण डक यांनी व्यक्त केलं. दरम्यान, प्रकाश सोळुंके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपण यापुढे निवडणूक लढवणार नसून राजकीय वारदार म्हणून पुतण्याला जाहीर करत असल्याचे सांगितले. त्यानुसार, राजकीय वारसदार म्हणून जयसिंह सोळुंके यांचं नाव त्यांनी जाहीर केलंय. 


कोण आहेत जयसिंह सोळुंके


माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. म्हणजेच, प्रकाश सोळंके यांचे पुतणे. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 


हेही वाचा


नारायण राणेंनी मानले मनोज जरांगेंचे आभार, सांगितलं मराठवाड्यात कधी येणार