Nagpur News नागपूर : पूजा खेडकर (Pooja Khedkar)  प्रकरणानंतर बनावट प्रमाणपत्राचा आधार घेत अनेक जण अधिकारी झाल्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहे. काही जणांनी दृष्टीदोष असल्याचे सांगितले तर काहींनी लोकोमोटिव्ह डिसऑर्डर असल्याचे सर्टिफिकेट दाखल केलेत. तर काहींनी ईडब्ल्यूएस कोट्यातून नोकरी मिळवली आहे. यावर प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार  बच्चू कडू  (Bacchu Kadu) यांनी तिखट प्रतिक्रिया देत आपली नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. मंत्रालयात जर अंध व दिव्यांग शिक्षकांना त्यांच्या वेतनाच्या एरियर्ससाठी लाच द्यावी लागत असेल, तर ही अतिशय शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार  बच्चू कडू  (Bacchu Kadu) यांनी दिलीय. 


मंत्रालयातच जर असे घडत असेल तर ही अतिशय शरमेची बाब- बच्चू कडू


नागपुरातील सेवानिवृत्त अंध व दिव्यांग शिक्षकांना त्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या एरियर्ससाठी मंत्रालयात दहा टक्के लाच मागितली जात असल्याची बातमी एबीपी माझा ने दाखवली होती. त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी काम करणारे आणि प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्रीसह अनेक मंत्री बसतात आणि त्याच मंत्रालयात जर अंध व दिव्यांग शिक्षकांना त्यांच्या वेतनाच्या एरियर्ससाठी लाच द्यावी लागत असेल, तर ही अतिशय शरमेची बाब आहे, अशा शब्दात  बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.  


आम्ही या अंध आणि दिव्यांग शिक्षकांवर लाच देण्याची वेळ येऊ देणार नाही. त्या आधीच मंत्रालयातील लाचखोरांचा बंदोबस्त करू, अशी ग्वाही बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच नागपुरात येऊन या अंध आणि दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांची भेट घेणार असेही बच्चू कडू यांनी सांगितले आहे.


मोर्चा काढणारच, आम्हाला कोण अडवतंय ते बघू, बच्चू कडूंचा निर्धार 


दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध मागण्यांसाठी आज या 9 ऑगस्ट रोजी बच्चू कडू यांचा छत्रपती संभाजीनगर मध्ये भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी राज्यभरातील म शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात केली आहे. मात्र या भव्य मोर्चाला स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याचं समोर आलं आहे. असे असले तरी हा मोर्चा लाखोंच्या उपस्थितीत आम्ही काढणारच, आम्हाला कोण अडवतंय ते बघू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. त्यामुळे बच्चू कडू यांच्या या मोर्चा कडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे याच मोर्च्यासाठी शहरातील चौका चौकात होर्डिंग लावण्यात आले आहे. मात्र यावेळी बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेला होर्डिंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.


हे ही वाचा