सिंधुदुर्ग : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नेतेमंडळींच्या दौऱ्यांची रांगच लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मराठवाडा दौऱ्यावर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जन सन्मान यात्रा, मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली तर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा सध्या जोमाने सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि नेते आपली भूमिका मांडत जनतेपर्यंत पोहोचत आहेत. आता, भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) हेही मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात (Marathwada) मोठा फटका बसला, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळेच त्यांना भाजपचा एकही खासदार मराठवाड्यात निवडून आला नाही. त्यामुळे, येथील मराठा बांधवांशी संवाद करण्यासाठी नारायण राणे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यावरुन, मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि नारायण राणे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मराठा नेते आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याकडून भाजप नेत्यांना, सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केलं जात आहेत. त्यातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन ते प्रखर शब्दात टीका करताना दिसून येतात. त्यामुळेच, जरांगेंना शह देण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी भाजपने नारायण राणेंच्या रुपाने एक चेहरा पुढे सरसावलाय. जरांगेंना जाब विचारण्यासाठी नारायण राणे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर बोलू नये असं नारायण राणेंनी म्हटलंय. भाजप नेत्यांची बाजू घेत राणेंनी जरांगेंवर हल्लाबोल केला होता. त्यावरुन, जरांगेंनी देखील राणेंचं आव्हान स्वीकारत त्यांना इशारा दिला. मला धमकी देण्यासाठी नारायण राणेंना फडणवीसांनी सांगितलं का? असा सवाल जरांगेंनी विचारलाय. तसेच, ते मराठवाड्यात येत असतील तर त्यांचं स्वागत करतो, असेही जरांगे यांनी म्हटलंय. आता, जरांगेंच्या या टीकेवर नारायण राणेंनी उत्तर देताना मराठवाडा दौरा कधी करणार याची माहिती दिली. तर, जरांगे यांचे आभारही मानले आहेत.
जरांगेना धन्यवाद, लवकरच मराठवाडा दौरा
मनोज जरांगे माझे स्वागत करत असेल तर मी त्याला धन्यवाद देतो. मी लवकरच मराठवाड्यात जाणार असून संसदेचं अधिवेशन संपल की लगेच मराठवाड्यात जाणार असल्याची माहिती नारायण राणेंनी दिली. भाजपच्या वतीने मराठवाडय़ात सलोखा निर्माण व्हावा, व गेल्या दहा वर्षांत भाजपने केंद्रात आणि राज्यात जी विकास कामे केली ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठवाड्यात जाणार, असा पुनरुच्चार देखील खासदार नारायण राणे यांनी कणकवलीत पत्रकारांशी बोलताना केला आहे. त्यामुळे, एकीकडे मनोज जरांगे यांची शांतता यात्रा संपल्यानंतर नारायण राणेंचा मराठवाडा दौरा सुरू होत असल्याने आगामी काळात अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळू शकतात. तर, मराठवाडा दौऱ्यात नारायण राणे मनोज जरांगेंची भेट घेतील का, हेही पाहायला मिळेल.
हेही वाचा
म्हाडाची लॉटरी जाहीर, कोणत्या गटात किती घरं, किंमत किती, तुम्हाला ही घरं परवडतील का?