Prithviraj Chavan On NCP : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या राज्याच्या केंद्रस्थानी आहे. त्यांनी अनेकदा भाजप प्रवेशाच्या बातम्या फेटाळल्या असल्या तरी चर्चा काही थांबत नाहीत. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. "राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आमच्यासोबत किती दिवस ते राहतील माहित नाही, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कर्नाटकातील निपाणी (Nipani) मतदारसंघात प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
"राष्ट्रवादी काँग्रेसने इथे आपला उमेदवार उभा केलाय असं मी ऐकलंय. काय झालंय ते अजून आमच्यासोबत आहेत. किती दिवस थांबतील माहित नाही कारण भाजपसोबत रोज बोलणी सुरु आहे. रोज पेपरमध्ये बातम्या येताती की कोण नेता जाणार, कोण थांबणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवावं. पण काय झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन स्वत:ची टक्केवारी वाढली तर पुन्हा आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल असं त्यांना वाटत असावं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर संजय राऊत म्हणाले...
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "मला त्याविषयी माहिती नाही. मला इतकंच माहित आहे की महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र आहोत. काल आपण आमची एकी आणि वज्रमूठ पाहिली. काल व्यासपीठावर अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण असे सगळे प्रमुख नेते उपस्थित होते," असं संजय राऊत म्हणाले.
काही दिवसात अजित पवार आमच्याकडे येणार : गुलाबराव पाटील
काही दिवसात अजित दादा पवार हे आमच्याकडे येणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत असताना, या केवळ चर्चा आहेत. यामध्ये कोणतेही तथ्य नाही, आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी पक्ष सोडणार नसल्याचं अजित पवार यांनी सांगून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काल झालेल्या वज्रमूठ सभेनंतर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसात अजित पवार हे आमच्याकडे येणार असल्याचा पुन्हा दावा केल्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.