Arun Gujrati: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा एकदा राजकीय पक्षांतरांचा हंगाम सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मोठी हालचाल झाली आहे. शरद पवारांचे (Sharad Pawar) जिवलग सहकारी, माजी विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अरुण गुजराती (Arun Gujrati) यांनी अखेर अजित पवारांच्या (Ajit) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (मंगळवार) संध्याकाळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात अरुण गुजराती अधिकृतपणे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

Continues below advertisement

Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली

अरुण गुजराती हे शरद पवार यांचे चार दशकांपासूनचे निष्ठावंत शिलेदार मानले जातात. त्यांनी काँग्रेस पक्षातून शरद पवारांसोबत राजकारणाची सुरुवात केली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून ते पक्षाशी घट्ट नातं जोडलं. गुजराती यांनी मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलं आहे. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केले होते.

Arun Gujrati: सकाळी शरद पवारांची भेट; संध्याकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

आज सकाळी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे अरुण गुजराती यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांसोबतचा राजकीय प्रवास संपवताना गुजराती यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला. ज्यांनी मला मोठं केलं ते शरद पवार आणि ज्यांनी मला पुढे आणलं ते माझे कार्यकर्ते. दोघांच्या मध्ये मी सँडविच झालो होतो. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला,”असं गुजराती म्हणाले.

Continues below advertisement

Arun Gujrati: कार्यकर्त्यांचा दबाव ठरला निर्णायक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्यानंतर चोपड्यात अरुण गुजराती यांच्या समर्थकांमध्ये मोठी फूट पडली होती. काही कार्यकर्ते भाजपात तर काही इतर पक्षात गेले. अजित पवार यांच्यासोबत गेले तर तुमच्यासोबत राहू नाहीतर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर अरुण गुजराती यांना अखेर निर्णय घ्यावा लागला आहे.

Arun Gujrati: चोपड्यात अजित पवार गटाची ताकद वाढणार

चोपडा परिसरात अरुण गुजराती यांची चांगली संघटनात्मक पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार गट कमकुवत झाला होता. आता गुजराती यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गटाला स्थानिक स्तरावर मोठा बळकटी मिळणार आहे. राज्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने या घडामोडींना अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार गटासाठी हा एक “प्रतिष्ठेचा” प्रवेश मानला जात आहे.

आणखी वाचा 

Jayant Patil: निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली