Jayant Patil: गेली 50 वर्षे ईश्वरपूर शहराच्या राजकारणात भाजपाचे एकनिष्ठ म्हणून परिचित असणाऱ्या दिवंगत माजी नगराध्यक्ष अशोकराव पाटील यांचे सुपुत्र व भाजपचे माजी नगरसेवक विक्रम पाटील (Vikram Patil) यांचे बंधू महेश पाटील (Mahesh Patil) आणि माजी नगरसेवक विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय. भाजपाच्या या दोन निष्ठावंतांच्या प्रवेशाने ईश्वरपूर शहरचे राजकारण कमालीचे फिरले आहे. पालिकेच्या राजकारणावर सावध व बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हा प्रवेश घेऊन पहिला डाव टाकला आहे. विरोधी भाजपसह समविचारी पक्षांना हा मोठा झटका मानला जात आहे. लवकरच आणखी काही दिग्गज राष्ट्रवादीत येतील असे पाटील यांनी सांगितले आहे.

Continues below advertisement

उरुण ईश्वरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व प्रभागातील उमेदवारांबाबत विकास आघाडीतील घटक पक्षांच्या बैठकांचा फार्स गेले दहा दिवस सुरु आहे. यात काही निष्ठावंतांना डावलून प्रक्रिया सुरु असल्याचे दिसल्याने या दोघांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यात भाजपा मित्रपक्षांचे सरकार असूनही भाजपाचे निष्ठावान असलेल्या महेश पाटील व विजय कुंभार यांनी केलेला प्रवेश भाजपासाठी आत्मचिंतन करायला लावणारा ठरेल. 

Jayant Patil: महेश पाटील हे जिद्दी कार्यकर्ते तर विजय कुंभार अभ्यासू नगरसेवक

यावेळी जयंतराव पाटील म्हणाले, महेश पाटील हे जिद्दी कार्यकर्ते तर विजय कुंभार अभ्यासू नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रवेशाने शहराच्या विकासाला गती येईल. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांना दुप्पट बळ मिळेल. शहराच्या भविष्याविषयी काळजी असलेले हे लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत ही आनंदाची बाब आहे. ईश्वरपूर शहराचा विकास करण्यासाठी आपल्याला अनेक स्वप्न होती. त्या स्वप्नांची पूर्तता करायला हे शहर अधिक गतिमान झालं पाहिजे. या शहरातल्या रखडलेल्या कामांना अधिक वेगाने पुढे नेले पाहिजे. शहरातल्या नागरिकांना महाराष्ट्रातल्या इतर शहरांसारख्या सुविधा सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात हा माझा प्रयत्न राहणार आहे. आमच्यावर विश्वास ठेवून अजूनही काही लोक प्रवेश करणार आहेत असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

Continues below advertisement

Mahesh Patil: गुंड नगरसेवक होत असेल तर आम्हाला त्याची गरज नाही

यावेळी महेश पाटील म्हणाले, आमचे घर भाजपचे एकनिष्ठ घर म्हणून 50 वर्षे शहरात परिचित आहे. आजही माझ्या घरावर भाजपचा झेंडा आहे. भाजप सोडताना प्रचंड वेदना होत आहेत. मात्र शहरात नगराध्यक्ष कोण असावा व पालिकेत नगरसेवक कोण असावेत हे तीन गुंडांच्या टोळ्या एकत्र येऊन ठरवू लागल्या आहेत. ते आम्ही चालू देणार नाही. वडील अशोकराव पाटील यांचा विचार जयंत पाटील यांच्या माध्यमातून पुढे घेऊन जाऊ. शहरातील नागरिकांवर अन्याय होता कामा नये ही कळकळ आहे. प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवारीबाबतच्या बैठकीत मोक्यातील आरोपीचे नाव पुढे आले. नगरसेवकपद हे अंतीम ध्येय नाही. पण गुंड नगरसेवक होत असेल तर आम्हाला त्याची गरज नाही. त्या बैठकीला माझे सख्खे बंधू व चुलत बंधू उपस्थित असूनही काही बोलले नाहीत. गुन्हेगार पालिकेत शिरकाव करीत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी जयंत पाटील यांनी आम्हाला ताकद द्यावी.

Vijay Kumbhar: ...म्हणून जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय 

विजय कुंभार म्हणाले, जयंत पाटील यांच्यासारख्या सक्षम व एकमुखी नेतृत्वाखाली काम केल्याशिवाय या शहराचा विकास होणार नाही. विरोधी आघाडी मजबूत आहे असे अनेकांना वाटते, मात्र आघाडीत गट-तट वाढले आहेत. अनेक निष्ठावंतांना डावलले जात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jayant Patil: माझीही पलिकडे ओळख : जयंत पाटील

माजी नगराध्यक्ष चिमण डांगे व विश्वास डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा धागा पकडत जयंतराव पाटील म्हणाले, आमचे कार्यकर्ते निवडणूक घोषित झाल्यापासून विचारात होते, त्यांना मी म्हटले, माझीही पलीकडे ओळख आहे. जरा थांबा असे कार्यकर्त्यांना सांगितले होते. आज यांचा प्रवेश झाला. येत्या आठ दिवसात आणखीन काहीजण येतील असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चार्ज केले.

आणखी वाचा 

Sharad Pawar & Dhananjay Munde: शरद पवारांचा परळीत धनंजय मुंडेंना मोठा धक्का, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख राष्ट्रवादीत दाखल, धनुभाऊंवर सनसनाटी आरोप