मुंबई : विजय शिवतारे आणि अजितदादा पवार यांचे व्यक्तीगत काही नाही. 2019 मध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघातील संजय जगताप यांची काँग्रेसची जागा होती. काँग्रेसला विजयी करण्यासाठी आणि शरद पवारांबद्दल विजय शिवतारे यांनी जे उद्गार काढले ते अजितदादांना पटले नाहीत. मात्र आता बालवाडीतील लोक काहीही बोलत असतील त्यांना अजूनही शरद पवार कळायचे आहेत. परंतु त्यांची फारशी दखल आम्ही घेत नाही अशी मिश्किल टिप्पणी करतानाच त्या कारणासाठीच अजितदादांनी विडा उचलला आणि असे शत्रूत्व निर्माण झाले. ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, शरद पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते. आज जे टिकाटिपण्णी करत आहेत तशी वस्तुस्थिती नाहीय असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. 


हर्षवर्धन पाटलांच्याबाबतीत काय घडले. 2014 मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आणि कॉंग्रेसमुळे आम्ही स्वतंत्र लढलो. त्यामुळे दत्तामामा भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर अधिकृत निवडून आले. 2019 मध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली असे सांगतानाच पक्ष टिकवण्यासाठी अजितदादांनी केलेली मेहनत आणि आज जो पक्ष उभा आहे त्यात अजितदादा व्यतिरिक्त कुणाचे योगदान नाही. म्हणूनच इतके आमदार निवडून आणता आले आणि 2019 मध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये अजितदादा यांचा सिंहाचा वाटा होता असा स्पष्ट दावाही सुनिल तटकरे यांनी यावेळी बोलताना केला. विजय शिवतारे जे बोलत आहेत त्यांचा तो राग आहे. मात्र काही लोकांना बरं वाटतंय. आता ही स्क्रीप्ट कुणाची आहे याचा शोध आम्ही घेत आहोत. मात्र मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे नेते असून ते योग्य ती भूमिका घेतील असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.


दोन दिवसांत जागावाटप होईल -


महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाची बोलणी एक - दोन दिवसात पूर्ण होईल. 48 जागांचे वाटप सन्मानपूर्वक होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून संबंध चर्चा करणे व 45+ उद्दीष्ट असल्याने आम्ही सर्वच गोष्टींचा आढावा घेत आहोत. त्यामुळेच एक - दोन दिवसांचा विलंब होत आहे पण तो फार विलंब आहे असे मला वाटत नाही, असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.


आव्हाडांना टोला 


आयुष्यभर बाष्कळपणाचे आणि सतत खोटे बोलणारे आव्हाड आहेत. एकतर ती याचिका काय होती तर आम्हाला चिन्ह मिळू नये ते रद्द करावे. मूळ याचिकेचा गाभा असा होता की, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दिलेली मान्यता असेल किंवा घड्याळ हे चिन्ह वापरण्यासाठी जी मान्यता दिली ती रद्द करावी, त्याला स्थगिती द्यावी त्यासाठी हा अट्टाहास केला गेला होता. त्यांना मात्र चपराक बसली आहे. घड्याळ चिन्ह वापरायला परवानगी दिली. त्यात सर्वोच्च न्यायालयाला जाहिरात देताना असे का म्हणावे लागले तर त्यांनी युक्तिवाद केला की, शरद पवार नेतृत्व करत असले तरी घड्याळ हे चिन्ह इतके रुजले आहे की पवारसाहेबांना मानणारा वर्ग देखील घड्याळ चिन्हाला मतदान करु शकतो त्यामुळे आमचा पराजय होऊ शकतो असे बोलण्याची दारुण पाळी युक्तिवादामध्ये आली हे सोयीस्करपणे काही लोक विसरतात असा टोला सुनिल तटकरे यांनी लगावला. 


इतके वर्ष वापरलेले चिन्ह आणि जनमानसात रुजलेले असल्याने हे झालेले आहे. एकीकडे एक बोलणं आणि दुसरीकडे युक्तिवाद करताना केविलवाणा प्रयत्न करणे हेच या त्यांच्या याचिकेत दिसले. आम्हाला मिळालेले चिन्ह थांबवावे हा त्यामागचा अट्टाहास  होता. मात्र तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे या निर्णयाने आम्ही समाधानी आहोत असेही सुनिल तटकरे म्हणाले. 


घट्याळ चिन्हावर काय म्हणाले ?


अटीशर्थी म्हणजे काय तर घड्याळ चिन्ह आमचे आहे. त्यांना भीती आहे की, घड्याळ चिन्हामुळे शरद पवारसाहेबांना मानणारा मतदार हा त्यांना मतदान करणार नाही ही भीती घालवण्यासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत की, आम्हाला घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मिळाले आहे. तेच चिन्ह घेऊन आम्ही निवडणूकीला सामोरे जाणार आहोत हेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. सर्रास खोटं बोलणे आणि विपर्यास करणे ही त्यांची आयुष्यातील भूमिका राहिलेली आहे. एकदाच्या जागा वाटप करा आमच्याबद्दल कशाला तुम्ही काळजी करताय तुमच्या वाट्याला किती जागा येतात ते एकदा जाहीर करा... दुसर्‍याचं वाकून बघण्यापेक्षा आपलं काय आहे ते वाकून बघा असा जोरदार टोला सुनिल तटकरे यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना लगावला.