छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली होती. त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. सतीश चव्हाण यांनी ही माहिती एबीपी माझा सोबत बोलताना दिली. गंगापूर विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आहेत.
सतीश चव्हाण काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले की,मागच्या दोन अडीच वर्षांपासून या मतदारसंघात काम करतोय. मतदारसंघात अस्वस्थता आहे, जसा म्हणावा तसा विकास या मतदारसंघाचा झाला नाही. कार्यकर्त्यांची देखील गेल्या 15-20 वर्षांपासून घुसमट होत आहे. मी काम करत असताना माझ्या लक्षात आलं की लोकांना बदल अपेक्षित आहे. आता सर्व्हेचा जमाना आहे, थोडं फार कमी जास्त होईल, पण जनता ज्याला पसंती देते त्याचं नाव येते. सर्व्हेमध्ये ज्याचं नाव येतं त्याला पक्ष किंवा आघाडी उमेदवारी देते, असं सध्या चालू आहे. त्यामुळं लढावं तर लागेल, सर्व्हेमध्ये पण मी पुढं येईल, असं सतीश चव्हाण यांनी म्हटलं.
प्रशांत बंब काय म्हणाले?
भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. सतीश चव्हाण हे निवडणूक लढणार आहेत हे मला माहित आहे .मला कोणाच्यातरी विरोधात निवडणूक लढवायची हे नाही तर ते त्यांनी मैदानात यावं, असं आव्हान प्रशांत बंब यांनी दिलं. सतीश चव्हाण यांच्या वरिष्ठांना आणि माझ्या वरिष्ठांना ही सगळी माहिती आहे की ते निवडणूक लढतील. वरिष्ठ काय तो निर्णय घेतील, असं प्रशांत बंब म्हणतील. मी विकासाच्या जीवावर निवडणूक लढणार आहे.पंधरा वर्षात महाराष्ट्रात एक वेगळा मतदार संघ मी निर्माण केलाय, असंही ते म्हणाले.
गंगापूर विधानसभा निवडणुकीत 2019 ला काय घडलेलं?
गंगापूरमध्ये 2019 ची विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. प्रशांत बंब हे त्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने पाटील आणि वंचितचे अंकुश कळवणे होते. प्रशांत बंब यांना 107193 मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या माने पाटील यांना 72222 मतं मिळाली होती. वंचितच्या अंकुश कळवणे यांना 15951 मतं मिळाली होती.
इतर बातम्या :