रायगड: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील घटकपक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असली तरी अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर धुसफूस आणि कुरबुरी सुरु असल्याचे चित्र आहे. अजितदादा गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते त्यांच्याविरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा रायगडावरून कडेलोट करुन आम्ही आगामी लोकसभा निवडणूक जिंकू, अशी आव्हानाची भाषा भाजपचे स्थानिक नेते वापरत आहेत. भाजपच्या या नेत्यांना सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते शनिवारी रायगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


यावेळी सुनील तटकरे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांची कोंडी करण्यासाठी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची ढाल पुढे केली. भाजपकडून गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) जाळे विस्तारण्याचा प्रयत्न सुरु आहे. मी २०१४च्या पूर्वीच्या परिस्थितीबद्दल बोलणार नाही. पण अमित शाह यांनी भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पक्षाला एक शिस्त लागली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये जे काही मोजके तीन-चार लोक माझ्याविरोधात सातत्याने बोलत आहेत, त्यांची नोंद भाजपकडून घेतली जाईल. हे लोक एकप्रकारे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एनडीए विस्तारण्याच्या धोरणाला विरोध करत आहेत. त्यांना अमित शाह आणि फडणवीसांची भूमिका आवडत नसेल. त्यामुळे हे लोक माझ्याविरोधात सातत्याने बोलत आहेत. या सगळ्याची भाजप पक्षाकडून दखल घेतली जाईल, असा इशारा तटकरे यांनी दिला. 


तसेच तुम्ही महायुतीच्या समन्वय समितीकडे रायगडमधील भाजप नेत्यांची तक्रार करणार का?, असा प्रश्न तटकरे यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, मी स्वतः समन्वय समितीचा सदस्य आहे. त्यामुळे मी त्या चार मोजक्या लोकांविरोधात तक्रार करण्याला एवढं महत्त्व मी त्यांना देत नाही. मात्र, त्यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे, हे मात्र स्पष्ट होत असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.


भाजपच्या स्थानिक नेत्यांचा रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा


रायगड लोकसभा मतदारसंघात गेल्या महिनाभरापासून भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून मेळावे घेतले जात आहेत. अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातही भाजपने दोन मेळावे घेतले होते. या मेळाव्यांमध्ये  सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती. गेल्यावर्षी अनंत गीते यांचा कडलोट केला. यंदा सुनील तटकरे यांचा कडेलोट करणार, तुम्ही महायुतीतसहभागी झालात ही युती वरिष्ठ पातळीवर मान्य असेल पण आम्ही मानत नाही, असे वक्तव्य भाजपचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी म्हटले होते.


2019 मध्ये भाजपनेच शिवसेनेचा उमेदवार पाडला


भाजप नेते प्रशांत शिंदे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनेच शिवसेनेचा उमेदवार पाडल्याचा गौप्यस्फोट केला. रायगड लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पराभूत करण्यात भूमिका बजावली असल्याची कबुली शिंदे यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


आणखी वाचा


आधी गीतेंना पाडलं आता सुनील तटकरेंचा कडेलोट करणार; रायगडमध्ये भाजप नेत्यांचे आव्हान