Nawab Malik Arrest :  मनी लाँड्रिंग प्रकरणी तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. यावरूनच आता महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ''भाजप आणि ईडी हे एकच असून ते एकत्र काम करतात'', अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझ्याशी बोलताना दिली. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत झुकणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.    

  


ईडी आणि भाजप एकच  


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ईडीची धाड पडणार आहे, हे त्यांच्याच (भाजप) लोकांनी आधीच सांगितलं होत. म्हणून आश्चर्य वाटलं नाही. मात्र ते इतका अतिरेक करणार असं वाटलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात इतकी टोकाची भूमिका कोणीच घेतली नव्हती. मात्र प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असते, असं म्हणायचं आणि पुढे वाढायचं. भाजपमधील काही लोक, त्यांचे नेते आणि मंत्री (केंद्र सरकारमधील) सातत्याने ट्विट करत होते की, 15 दिवसांनी अटक होईल, 15 दिवसांनी रेड पडेल, अर्थातच आता हे खरं झालं आहे, असं त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, ''ईडी आणि भाजप एकत्र काम करतात, किंवा एकच आहेत, असा आता अर्थ काढावा लागेल.''                     


महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही 


सुप्रिया सुळे म्हणल्या, ''केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापरकरून लोकांना त्रास द्यायचा, त्यांना भीती दाखवायची. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणारही नाही.'' संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आणि आम्ही सर्व नवाब मलिक यांच्या सोबत आहोत. आजही होतो उद्याही राहू आणि आमची लढाई सुरूच ठेवू, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.    


दरम्यान, नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत.