पुणे : राष्ट्रवादी कुणाची? याबाबत आज (6 ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडं सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यावरच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (jayant patil) यांनी पक्ष आमचाच आहे आणि जास्तीत जास्त लोक पवार साहेबांसोबत आहे, असा दावा केला आहे. पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारीदेखील आमच्यासोबत आहेत शिवाय दिल्लीत 24 राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमच्यासोबत होते, असं त्यांनी म्हटलं आहे. 


शिवसेनेच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात प्रश्न मांडला गेला त्यावेळी, आमदार गेले म्हणजे पक्ष जातो असं नाही, तर पक्ष हा कायम पक्ष राहतो, असं सर्वौच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती चंद्रचुड यांनी म्हटलं होतं. आमचे आमदार पक्षापासून लांब गेले किंवा त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे पक्ष जाण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष आपलाच आहे, असा दावा केला आहे. 


'निवडणूक आयोग चुकीचा निर्णय देणार नाही'


या सगळ्या प्रकरणाबाबत निवडणूक आयोग चुकीचा निर्णय देणार नाही मात्र जर निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला तर आम्ही कोर्टात जाऊ, असंदेखील स्पष्ट केलं आहे.  राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येईल असे मला वाटत नाही. ते वेगळे झालेत त्यामुळे आम्ही वेगळे आहोत. एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असंदेखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. 


'पक्ष चोरी जाऊ देऊ नको रे, विठ्ठला'



सध्या राज्यात पक्ष चोरीचा प्रकार सुरु आहे. आधी शिवसेना चोरी गेला आणि राष्ट्रवादी जायच्या तयारीत आहे. देशात पक्षाची चोरी होत आहेत , एकाची झाली आता मात्र यापुढे पक्षाची चोरी होऊ नये, असं विठ्ठलाला जयंत पाटील यांनी साकडं घातलं आहे.


'वंचित' इंडिया आघाडीत येणार का?


'वंचित' इंडिया आघाडीत येणार? याबाबत माझ्या स्तरावर चर्चा सुरू नाही आहे. त्यामुळे दुसरं कुणी चर्चा करत असेल, असं मला वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.


'भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय कधीच घेतला नाही'


जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी जून 22 मध्ये भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यासंदर्भात शरद पवारांना पत्रही दिलं होतं.  त्यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, “भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय मी किंवा जितेंद्र आव्हाडांनी घेतला नाही आणि माझ्याबरोबरच्या कोणत्याही नेत्याने हा निर्णय कधीच घेतला नाही"


पक्ष आणि चिन्ह मिळेल, असा अजित पवार गटाला आत्मविश्वास आहे. आपण म्हणेल त्याप्रमाणे निवडणूक आयोग निर्णय देईल. असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते बोलत असतील, असं म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. 


रश्मी शुक्ला यांच्यावरचे आरोप कसे रद्द झाले? जयंत पाटलांचा सवाल


रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक करण्याचा निर्णय झाला आहे. पण त्याच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात झालेले आरोप रद्द कसे झाले? हे माहिती नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच  रजनीश सेठ यांना MPSC चे प्रमुख करण्याचे कारण कळले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  


'सर्व जातनिहाय जनगणना व्हायला हवी'


सर्व जातनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहेत. जातनिहाय जनगणना झाल्यास देशातील आरक्षणाचा न्याय मिळेल. मुख्यमंत्री एक बोलतात आणि उपमुख्यमंत्री दुसरीकडे दुसरे बोलतात त्यामुळे नक्की काय होईल? हे कळत नाही आहे. मात्र जातनिहाय जनगणना झाली तर ते सगळ्यांसाठी फायद्याचं आहे, असं ते म्हणाले. 


इतर महत्वाची बातमी-


Goregaon Fire: गोरेगावात भीषण अग्नितांडव, सात जणांचा मृत्यू, 58 जखमी, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत