Sharad Pawar Admitted in Hospital : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मुंबईतील (Mumbai) ब्रीच कॅन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार पुढील तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र डॉक्टरांनी सल्ला देताच शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत पत्रक जारी केलं आहे. या पत्रकातील माहितीनुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे 3 नोव्हेंबरला शिर्डीला जाणार आहेत. तर शिर्डीला होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रवादीच्या पत्रकात काय म्हटलंय?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात लिहिलं आहे की, "आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. दि. 2 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल व दि. 3 नोव्हेंबर 2022 रोज शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या दि. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे."
शरद पवारांवर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया
मागील वर्षी मार्च महिन्यात शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना 30 मार्च रोजी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयात खडे तयार झाल्याने त्यांच्या पोटात दुखत असल्याचं निदान झालं होतं. नंतर एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले.
बारामतीमध्ये दिवाळी साजरी
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरा केली होती. यावर्षी देखील बारामतीतील त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी समर्थक आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. आपल्या नेत्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवण्यासाठी म्हणून अनेकांनी उपस्थिती लावली होती. शरद पवार यांच्यासह त्यावेळी अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि पार्थ पवार यांनीही उपस्थित राहत समर्थकांच्या प्रेमाचा आणि शुभेच्छांचा स्वीकार केला.