मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात येथील निवडणुका होत आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही दिल्ली विधानसभेसाठी रणशिंग फुंकले असून येथील निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचंही नाव आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिलेल्या मंत्री धनजंय मुंडेंचं (Dhananjay munde) नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या 20 स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचेही नाव आहे. 


देशाची राजधानी आणि केंद्र शासित प्रदेश असलेल्या दिल्ली विधानसभेतील 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होत असून 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्वच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने 68 जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले असून 2 जागा मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याचे समजते. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभेसाठी कंबर कसली असून आत्तापर्यंत 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आता, राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक राहिलेल्या धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचही नाव नाही. 


पार्थ पवारांना संधी, धनंजय मुंडेंचं नाव नाही


बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे सध्या मंत्री धनंजय मुंडे विरोधकांच्या व बीडमधील लोकप्रतिनिधींच्या निशाण्यावर आहेत. याप्रकरणी विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे म्हणत अजित पवारांनी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधीच धनंजय मुंडे परळीला गेल्यामुळे त्यांना मोदींच्या दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात झाल्याचं दिसून आलं. आता, दिल्ली विधासभेसाठी राष्ट्रवादीच्या 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, फैज अहमद यांचे नावे आहे. त्यासह, पार्थ पवार यांनाही दिल्लीसाठी स्टार प्रचार करण्यात आलं आहे. मात्र, या यादीत धनंजय मुंडेंचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


हेही वाचा


ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय