Mohit Kamboj on Nawab Malik: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर जल्लोष करणे मोहित कंबोज यांना महागात पडलंय. नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोहित कंबोज यांच्या निवासस्थानाजवळ फटाके फोडून जल्लोष केला. तर, यावेळी मोहित कंबोज हे तलवार नाचवताना दिसून आले. यानंतर मोहित कंबोज यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर मोहित कंबोज यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. तसेच त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करण्यात आलेत, असंही त्यांनी म्हटलंय. 


नवाब मलिक यांना काल (23 फेब्रुवारी) ईडीच्या अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या चौकशीनंतर अटक  केली. भाजप नेत्यांवर आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना अटक होताच भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. याचदरम्यान, मोहित कंबोज यांच्या निवास्थानाजवळ भाजप नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. त्यानंतर मोहित कंबोज यांच्याविरोधात कोविड नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याबद्दल सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


मोहित कंबोज हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार
माझ्यावर चुकीच्या पद्धतीने अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. जेव्हा सेना भावना मध्ये संजय राऊत यांनी पत्रकार परिषद करून लोक जमा केली आणि आत्ता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सर्व मंत्री एकवटलेले आहेत त्यांचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत यांच्यावर गुन्हा दाखल नाही करणार का? 188 चा गुन्हा दाखल केला का? असा प्रश्न कंबोज यांनी विचारलाय. तसेच याप्रकरणी मी हायकोर्टात जाणार, असा इशाराही त्यांनी दिलाय.


मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील जर त्यांना वाटत असेल की मंत्रिमंडळ जेलमधून चालावं तर त्यांना अभिनंदन आहे. अनिल देशमुख तर जेलमध्ये आहेत आता नवाब मलिक सुद्धा जेलमध्ये जातील आणि त्याच सोबत जावेद सुद्धा लवकरच जेलमध्ये जाणार. "वर्क फ्रॉम होम" बरोबरच वर्क फ्रॉम जेल हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रभर मॅसेज देणार असतील तर त्यांना अभिनंदन, असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय.


टाडा लागलेल्या गुन्हेगारी व्यक्तीकडून जमीन खरेदी
देशापेक्षा मोठा कोणताही नेता नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा पद्धतीने काम करणाऱ्या नेत्याला मंत्री मंडळात कसं ठेवतात. टाडा लागलेल्या गुन्हेगारी व्यक्तीकडून ही जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे या संदर्भात तपास यंत्रणा काम करत आहे त्यावर अधिक भाष्य योग्य नाही आहे. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, त्यांच्याशी आम्ही नेहमीच भेटतो. 


नवाब मलिकांवर सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप
ज्या मंत्र्याला निवडून विधानसभेत पाठवले ते मुंबईत डान्सबार चालवायचे. बांग्लादेशातून मुली आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जात होते. कंबोज यांनी अशा अनेक मुलींवर स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा केला आहे. ज्यामध्ये त्या मुलींनी कबूल केले आहे की नवाब मलिकने त्यांना हे काम करण्यास भाग पाडलंय, असा आरोपही मोहित कंबोज यांना मलिकांवर आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha