मुंबई : भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नबाव मलिक यांनी अखेर महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत नवाब मलिक आज व्यासपीठावर दिसून आल्याने त्यांची भूमिका उघड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मलिक कोणाकडे राहणार, यावरुन राष्ट्रवादीत रणकंदन सुरू होतं. मात्र, मलिक यांच्या भूमिकेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली होती. जेव्हा फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा सुप्रिया सुळे एकटी त्यांच्या बाजूने बोलली होती, असेही सुळे यांनी बोलून दाखवले. पण, आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.  


अजित पवार यांनी सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देण्यात येत असलेल्या जबाबदारीची घोषणा केली. सना मलिक वडिलकीच्या नात्याने माझ्याकडे येत असते. तिच्या विधानसभा क्षेत्रातील लोकांची कामं ती घेऊन येत असते. आज मी जाहीर करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सना मलिक ही स्पोकपर्सन प्रवक्ता असेल. एक मोठी जबाबदारी आपण तिला देत आहोत, असे म्हणत अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्या कन्येकडे मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो. सनाचं इंग्रजी, हिंदी चांगलं आहे, आता मराठीपण चांगला होईल, तू घाबरू नको, असेही अजित पवार यांनी म्हटले. 


13 वर्षांपासून अजित दादांसोबत नातं


आपण एक आठवड्यापूर्वी यासाठी तयारी सुरु केली होती आणि अचानक कळलं की मला आज या कार्यक्रमात भाषण करायचं आहे. 13 वर्षांपासून अजित दादा आणि माझं नातं आहे, त्यांनी माझ्या कार्यालयाचं तेंव्हा उद्घाटन केलं होतं. याच ठिकाणी आपण 5 वर्षांपूर्वी अनुशक्तीनगर निवडणुकीची सुरुवात केली होती, आणि नवाब मलिक यांना निवडून आणले. त्यानंतर आपल्याला रिटर्न गिफ्ट म्हणून मलिक साहेब यांना मंत्री केल्याची आठवण सना मलिक यांनी भाषणात सांगितली. कोरोनाचा काळ होता, तेंव्हा मोठी अडचण आमच्यासमोर आली. दीड वर्ष आमच्यासोबत कुठलाही आमदार नव्हता. मात्र, जेंव्हा गरज पडली तेंव्हा अजित दादांनी मला साथ दिली. नवाब मलिक अनुपस्थित असताना अनेकांनी कटकारस्थान केलं, काम थांबविले. पण, दादांनी संकटात आमची साथ दिल्याचंही सना मलिक यांनी म्हटलं. 


लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवावी


लाडकी बहीण योजना सुरु केली तेंव्हा अनेक भ्रम पसरविण्यात आले. लोकांना वाटत नव्हतं योजनेचे पैसे येतील. पण, आम्हाला 14 ऑगस्टला कॉल यायला लागले, 3000 रुपये आले. त्यामुळे, आम्ही पूर्ण अनुशक्तीनगरच्या महिला पूर्णपणे धन्यवाद देतो, तसेच 31 ऑगस्टची डेडलाईन तुम्ही योजनेची वाढवावी आणि रक्कम थोडी वाढवून द्यावी, असे निवेदन महिलांकडून मी करते, असेही सना यांनी भाषणात म्हटले. 


2 कोटी 50 लाख महिला अर्ज करतील - अजित पवार


रक्षाबंधन राज्यभर साजरा केला जातोय, वेगवेगळ्या जिल्ह्यात आम्ही जातोय आणि राज्यभर यात्रा करतोय. संवाद आम्ही वेगवेगळ्या वर्गासोबत साधतोय.
योजनाची माहिती आम्ही लोकांपर्यत पोहचतोय. मी राखीची शपथ खातो की माझ्या बहिणीला सक्षम करण्याचा आत्मसन्मानाने त्यांना जगता यावं यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेल. 31 जुलै आधी ज्यांनी अर्ज भरले त्या महिलांना पैसे आले आहेत. अजूनही अर्ज भरले जात आहेत. राज्यातील 1 कोटी 10 लाख महिलांना पैसे मिळाले आहेत. 31 ऑगस्टपर्यंत किती महिला लाडकी बहीणी अर्ज करतात हे बघू, आमचा अंदाज आहे 31 ऑगस्ट पर्यत 2 कोटी 50 लाख महिला अर्ज भरतील, असे अजित पवार यांनी म्हटलं.   


3 महिन्यांचे 4500 रुपये मिळतील


ज्यांनी अर्ज भरला नाही त्यांनी चिंता करू नका, अजून वेळ आहे. प्रत्येकाला पैसा मिळणार, ज्यांना अर्ज भरून पैसे आले नाहीत त्यांना सप्टेंबरमध्ये पैसे येतील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळून एकत्र 4500 रुपये येतील, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.  ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हा चुनावी जुमला नाही. 5 वेळेस उपमुख्यमंत्री म्हणून मी काम केलं आहे, 45 हजार कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी केलीय. तुमच्या खात्यात जो पैसा आलाय तो वापस घेण्यासाठी दिलेला नाही, तुमच्या खात्यातला पैसा आता तुमचाच आहे, असेही अजित पवार यांनी म्हटलं.