मुंबई : वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले नवाब मलिक (Nawab Malik) हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Session 2023) हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक हे नागपूरच्या (Nagpur) दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या नवाब मलिक हे वैद्यकीय जामीनावर बाहेर आहेत. त्यामुळे, आता उद्याच्या अधिवेशनात नवाब मलिक हे शरद पवार की अजित पवार गटाच्या बाजूला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मालिकांच्या वतीने सध्यातरी आपण तटस्थ असल्याची भूमिका जाहीर करण्यात आली आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 7 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यासाठी आजपासून सर्वच पक्षातील नेते आणि आमदार नागपुरात दाखल होतांना पाहायला मिळत आहे. राज्यात गाजत असलेल्या वेगवेगळ्या मुद्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याच अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक देखील चर्चेत आले आहे. कारण वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या मलिक यांनी राष्ट्रवादीत झालेल्या गटबाजीनंतर आपण कोणत्या गटात जाणार याबाबत कुठलेही भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर,उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मलिक हे शरद पवार की अजित पवार गटाच्या बाजूला बसणार याची चर्चा होत आहे.
अधिवेशनात फक्त दहा दिवस कामकाज
यंदा अधिवेशन अवघ्या दहा दिवसांचे होत असून यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भात होणारे अधिवेशन किमान सहा आठवड्यांचे असावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तर, यंदा 7 ते 20 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात फक्त दहा दिवस कामकाज होणार असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दहा दिवसांच्या अधिवेशनाची खिल्ली उडवण्यासाठी नागपूरच्या विमानतळावर प्रत्येकाच्या नजरेस पडेल अशा दर्शनी भागांत बॅनर लावले गेले आहेत.
विरोधकांचा चहापान कार्यक्रमावर बहिष्कार
नागपूर हिवाळी अधिवेशनाची उद्यापासून सुरुवात होत असून, त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 5 वाजता चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, विरोधी पक्षाने परंपरेप्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असला तरीही मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख मंत्री चहापान कार्यक्रमास उपस्थित आहेत. दरम्यान, या कार्यक्रमानंतर मंत्री मंडळ बैठक होणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री स्वतः पत्रकार परिषदेस संबोधित करतील.
इतर महत्वाच्या बातम्या: