Navnath Waghmare Beed बीड: मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने कुणबी दाखले देण्यासंदर्भातला शासन निर्णय काढलाय. मात्र या निर्णयाला ओबीसी (OBC) नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावरती विरोध होताना पाहायला मिळतोय. दरम्यान, काल बीडचा भोगलवाडीमध्ये ओबीसीचा महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांचे आक्रमक भाषण पाहायला मिळाले. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा होता. मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्या विरोधात गरळ ओखण्याचे काम करतोय, असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी केला.
नवनाथ वाघमारे काय काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा होता. मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्या विरोधात गरळ ओखण्याचे काम करतोय, असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी केला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी ठरवलं असतं तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंखे देखील पराभूत झाले असते. माजलगाव मतदार संघामध्ये आपला आमदार पाहिजे. यासाठी आत्तापासून कामाला लागायचं, असं नवनाथ वाघमारेंनी सांगितलं. ओबीसी काय आहेत हे जरांगेंना सपोर्ट करणाऱ्या शरद पवारांना दाखवून दिले आहे. बच्चू कडूंना घरचा रस्ता देखील ओबीसींनी दाखवला. आमच्या पाठीमागून वार करू नका. लक्ष्मण पवार यांना वापस पाठवलं, पण पापड्या आमदाराला निवडून दिलं हे गेवराईकरांची चूक होती, असं नवनाथ वाघमारे म्हणाले.
चंदनचोराला खासदार केलं- नवनाथ वाघमारे
बीडचा बेवडा आमदार म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नवनाथ वाघमारे यांनी निशाणा साधला. क्षीरसागर यांच्या घराला आग लागली. तेव्हा मुस्लिम समाजाने मदत केली. मात्र हा जरांगेच्या पाया पडतो. तसेच शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे चंदन चोर खासदार आहे. ओबीसींचं चुकलं आणि चंदनचोराला खासदार केले. चंदन चोर पुन्हा खासदार काय जिल्हा परिषद सदस्य पण होता कामा नये, असं नवनाथ वाघमारेंनी उपस्थितांना सांगितले.
घाणेरडे लोक मराठा असू शकत नाहीत- नवनाथ वाघमारे
ओबीसींच्या आरक्षणावर घाला घालण्याचे काम राज्यकर्ते करत आहेत. राज्य सरकारने काढलेल्या जीआरला विरोध केला पाहिजे. आता रस्त्यावरची लढाई आपल्याला लढायची आहे. निजामाच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय हाणून पाडायचा आहे. शरद पवार नावाचा जातीवादी म्हणून आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा स्वतःला पाईक म्हणत आलाय. राजेश टोपेंनी जरांगेंचा आंदोलन सुरू केलं, असा आरोपही नवनाथ वाघमारेंनी केला. या राज्यात 15 टक्के सुद्धा मराठा समाज नाही. मराठा समाजाने मुंबईत जाऊन राज्याला वेठीस धरले त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. घाणेरडे लोक मराठा असू शकत नाहीत. पुढच्या वेळेस त्यांचे शंभर आमदार कमी झालेले दिसतील. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींच्या 56 हजार जागा आल्या पाहिजेत. त्यांनी फाट्यावरील बॅनर रात्री फाडले. मात्र आपण त्यांचे बॅनर दिवसा काढून टाकले. तुम्ही शास्त्रींवर टीका करता. पण तुमचे महंत जरांगे ना दवाखान्यात जाऊन भेटतात त्याचं काय?, असा सवाल नवनाथ वाघमारेंनी उपस्थित केला. शासनाने काढलेले परिपत्रक रद्द केल्याशिवाय शांत बसायचं नाही, असंही नवनाथ वाघमारे म्हणाले.