National Herald Case: नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. त्यांची आज सुमारे 10 तास चौकशी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना मंगळवारीही चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली.


राहुल गांधी आज सकाळी 11.05 वाजता मध्य दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवर असलेल्या ईडीच्या मुख्यालयात पोहोचले. केंद्रीय तपास संस्थेच्या कार्यालयाभोवती पोलीस आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. तसेच येथे फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी ईडी कार्यालयातून जेवणासाठी बाहेर आले आणि सुमारे तासाभरानंतर पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर पुन्हा चौकशी सुरू झाली.


राहुल गांधी यांची गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सलग तीन दिवस ईडी अधिकाऱ्यांनी 30 तासांहून अधिक चौकशी केली होती. ज्यादरम्यान मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. गेल्या शुक्रवारी ते पुन्हा तपास यंत्रणेसमोर हजर होणार होते. मात्र राहुल गांधी यांनी ईडीच्या तपास अधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांची आई सोनिया गांधी आजारी असल्याने त्यांना शुक्रवारी (17 जून) होणाऱ्या चौकशीतून सूट देण्याची विनंती केली होती. ईडीने त्याची विनंती मान्य करून त्याला 20 जूनला हजर राहण्यास सांगितले होते. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोविड-19 च्या प्रकृतीच्या त्रासामुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणी ईडीने त्यांना 23 जून रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sonia Gandhi Health Updates: सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज, 23 जून रोजी ईडीच्या चौकशीला राहणार हजर?
Rahul Gandhi: राहुल गांधींची आज चौथ्यांदा ईडी चौकशी; काँग्रेस आजही आंदोलन करणार