Rahul Gandhi : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज पुन्हा ईडी कार्यालयात नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी हजेरी लावणार आहेत. राहुल गांधी यांची ही चौथ्यांदा ईडीकडून चौकशी होणार आहे. मागील आठवड्यात राहुल गांधींची ईडीने सलग तीन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर आज चौथ्यांदा चौकशी होणार आहे. या दरम्यान आजही काँग्रेसकडून निदर्शने होण्याची शक्यता आहे. 


मागील आठवड्यात झालेल्या चौकशीत ईडीने राहुल गांधी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. राहुल गांधी यांनी पहिल्यांदा 13 जून रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावली होती. राहुल गांधी यांना पहिल्या दिवशी 50 प्रश्न, दुसऱ्या दिवशी 36 प्रश्न आणि तिसऱ्या दिवशी साधारण 24 प्रश्न विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दरम्यान राहुल गांधी यांच्या चौकशीचे व्हिडिओ रेकोर्डिंग करण्यात आले. त्याशिवाय, त्यांनी दिलेल्या जबावावर ईडी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी घेतली असल्याचे म्हटले जात आहे. 


तीन दिवसांत 30 तास चौकशी


राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ईडी आणखी काही बड्या लोकांना चौकशीसाठी समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यंग इंडियन प्रकरणात ईडीने राहुल गांधी यांची तीन दिवस 30 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली. या चौकशीदरम्यान राहुल गांधी यांची बँक खाती, परदेशी मालमत्ता आणि यंग इंडियन आणि असोसिएट जर्नल लिमिटेडला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात आली.


तांत्रिक प्रश्नांवर राहुल गांधी यांचं मौन 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी संपूर्ण स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की, यंग इंडिया कंपनी ही नफ्यासाठीची कंपनी नाही किंवा कोणताही संचालक या कंपनीकडून वैयक्तिकरित्या नफा घेऊ शकत नाही. काँग्रेसचे माजी दिग्गज नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे खात्यांतील व्यवहारांची माहिती असायची. अनेक तांत्रिक प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी मौन पाळलं आणि यासंदर्भात आपल्या सीएला विचारू किंवा माहिती गोळा करू, असं सांगितल्याचा दाव सूत्रांनी केला आहे.


प्रकरण नेमंक काय?


काँग्रेस पक्षाकडून कर्ज देण्याच्या नावाखाली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्डची 2,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचा आरोप करत सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. काँग्रेसनं यापूर्वी 26 फेब्रुवारी 2011 रोजी नॅशनल हेराल्डची कंपनी असोसिएट जर्नल्स लिमिटेड (AJL) ला 90 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. यानंतर 5 लाख रुपये घेऊन यंग इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये सोनिया आणि राहुल यांची 38-38 टक्के भागीदारी आहे. उर्वरित भागभांडवल काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे आहे. यानंतर यंग इंडियाला प्रत्येकी 10 रुपयांचे असे, 9 कोटी शेअर्स देण्यात आले आणि त्या बदल्यात यंग इंडियाला काँग्रेसचं कर्ज फेडावं लागलं. नऊ कोटी शेअर्ससह, यंग इंडियाला असोसिएट जर्नल लिमिटेडचे ​​99 टक्के शेअर्स मिळाले. यानंतर काँग्रेस पक्षानंही 90 कोटींची कर्जमाफी केली. म्हणजेच, यंग इंडियाला एजेएलची मालकी मोफत मिळाली.