Nashik Politics BJP: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ग्रामीण भागात  मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP Sharad Pawar Faction) धक्का तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP Ajit Pawar Faction) ताकद असणाऱ्या मतदारसंघात प्रवेश करून मित्र पक्षालाच शह देण्याची रणनीती आखली जात आहे. यातूनच आज मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्यांचे पक्ष प्रवेश करण्यात आले. 

Continues below advertisement


राज्यात एकीकडे बोगस मतदारांच्या मुद्यावरून महाविकास आघडीकडून भाजपला टार्गेट केले जातं असतानाच भाजपकडून पक्षाचा विस्तार आणि विरोधी पक्षाला खिळखिळे केले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या दिंडोरी आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघात दोन महत्वाचे प्रवेश झाले. दिंडोरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या सुनीता चारोस्कर आणि त्यांचे पती माजी आमदार रामदास चारोस्कर यांचा पक्ष प्रवेश झाला. तर सिन्नरमध्ये शरद पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधून राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना आव्हान देणारा युवा चेहरा उदय सांगळे यांना रेड कार्पेट टाकण्यात आले. 


Dindori and Sinnar Vidhan Sabha: दिंडोरी, सिन्नर विधानसभेत काय घडलं?


नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात 2024 ची विधानसभा निवडणुक लढविणाऱ्या सुनिता चारोस्कर यांना 94 हजार 219 तर नरहरी झिरवाळ यांना 1 लाख 38 हजार 622 मते मिळाली होती. म्हणजेच चारोस्कर यांचा 44 हजार 403 मतांनी पराभव झाला होता. तर सिन्नर विधानसभा मतदारसंघातून माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या उदय सांगळे यांचा 41 हजार 93 मतांनी पराभव झाला. उदय सांगळे यांना 96 हजार 616 इतकी मते मिळाली, तर माणिकराव कोकाटे यांच्या पारड्यात  1 लाख 37 हजार  709 एवढ्या मतदान पडले. 


NCP Ajit Pawar Faction: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीला ब्रेक?


शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला हा धक्का वाटत असला तरीही दुसरीकडे भाजप आपला विस्तार करताना मित्र पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीला ब्रेक लावत असल्याचे बोलले जात आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून मतदारसंघातील गावागावात पक्षाचे नेटवर्क उभं करण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनसुब्यालाच सुरुंग लावण्याचे काम भाजपने केले आहे. कारण भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या उदय सांगळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करतानाच माणिकराव कोकाटे यांनाही लक्ष केले आहे. 


Mahayuti: महायुतीतील घटक पक्ष कसे उत्तर देणार? 


येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे. पण ग्रामीण भागात महायुतीतून लढण्याची वेळ आली तर अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याला महायुतीचे घटक पक्ष आणि महाविकास आघाडी कसे उत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  


राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा व्हिडीओ



आणखी वाचा 


Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?