Narhari Zirwal, Nashik : राष्ट्रवादीचे नेते झिरवाळ यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, महायुतीकडून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिंडोरीमध्ये शिंदेंच्या शिवसैनिकाने बंडखोरी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार धनराज महाले यांनी  बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. 


नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघातून धनराज महाले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा होणार का? असा सवाल विचारला जातोय. धनराज महाले हे शिवसेनेकडून  दिंडोरी मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्याने धनराज महाले यांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नरहरी झिरवाळ या मतदारसंघाचे उमेदवार आहेत. 


नरहळी झिरवाळ यांनी भरला उमेदवारी अर्ज 


दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सलग तिसऱ्यांदा नरहरी झिरवाळ दिंडोरी मतदार संघातून लढणार आहेत. त्यांना तिसऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नरहरी झिरवाळ दिंडोरी विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोकुळ झिरवाळ लढतील, अशी चर्चा होती. मात्र, गोकुळ झिरवाळ माझंच काम करतील, असा खुलासा गोकुळ झिरवाळ यांनी केला आहे.  


गोकुळ झिरवाळ माझंच काम करणार; नरहरी झिरवाळांचा खुलासा 


गोकुळ झिरवाळ हे नरहरी झिरवाळ यांचे पुत्र आणि ते महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी जवळपास तयारी दर्शवली होती. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्या उमेदवारीबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. याच मतदारसंघातून धनराज महाले यांनी देखील बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  


उपमुख्यमंत्री अजित पवार जुलै 2023 मध्ये महायुतीमध्ये सामील झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यावेळी नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांची साथ दिली होती. निवडणुकीच्या तोंडावर काही आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली. मात्र, नरहरी झिरवाळ अजूनही अजित पवारांसोबत आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Maharashtra Vidhansabha Election : सर्वच पक्षांमध्ये घराण्यांचा सुळसुळाट, दिग्गज नेत्यांच्या पोराबाळांना तिकीट, भावांनाही गोंजारलं


अजित पवारांवर दोन उमेदवारांचा 'प्रहार', मतदारसंघात बंडखोरी; महिला नेत्यानंही साथ सोडली