जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. आज मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे (Muktainagar Assembly Constituency) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यासोबत लढत होणार आहे.  40 वर्षानंतर प्रथमच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आली आहे. 


मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाची उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची लढत होणार आहे. गेली 40 वर्ष एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे होता. एकनाथ खडसे यांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होते. मात्र, एकनाथ खडसेंचा हा गड भेदण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीचा शुभारंभ हा मुक्ताईनगरमध्ये केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 


महायुतीचे सरकार पुन्हा येऊ दे, अशा प्रकारचं साकडं आज आपण संत मुक्ताई चरणी घातले आहे. संत मुक्ताईचा आशीर्वाद घेऊन आपण आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याच बरोबर प्रचाराचा शुभारंभ करत असल्याचे मुक्ताईनगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. विकासाच्या मुद्यावर आपण ही निवडणूक लढविणार आहोत. खडसे परिवारावर आज आपण बोलू इच्छित नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 


आपलाच विजय होणार : रोहिणी खडसे 


दरम्यान, महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) या आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे यांनी म्हटलं की, उमेदवार यादी अद्याप जाहीर झालेली नसली तरी ती आज होईल. उमेदवारी अर्ज भरण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आदेशाने आपण उमेदवारी अर्ज भरत आहोत. आदिशक्ती संत मुक्ताईचे दर्शन घेऊन आपण अर्ज भरत आहोत. जनता आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपलाच विजय होईल, असा विश्वास ही रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी : आमचा एक मेंबर इच्छुक म्हणून जाणार आणि गेम करणार, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी