मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा होताच मतदारसंघात बंडाचे निशाण फडकले जात आहे. त्यातच, यंदा प्रथमच महायुती व महाविकास आघाडी म्हणून तीन सहा राजकीय पक्ष आमने-सामने आहेत. त्यात, शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होत आहे. नुकतेच अजित पवारांनी (Ajit pawar) आपल्या 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये, अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील विद्यमान आमदाराचे तिकीट कापण्यात आलंय. त्यामुळे, येथील आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी बंडखोरी करत थेट तिसऱ्या आघाडीत प्रवेश केलाय. आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांच्या प्रहार पक्षातून ते मैदानात उतरणार आहेत. दुसरीकडे नागपूरमधून आभा पांडे यांनीही बंडखोरी केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, दोन मतदारसंघात अजित पवारांना उमेदवारांनी धक्का दिलाय.  


निवडणुकीच्या अगदी तोंडावर बच्चू कडू यांनी 'परिवर्तन महाशक्ती' नावाने तिसरी आघाडी तयार केली. आता, त्यांच्या पक्षात इन्कमिंग सुरू असल्याचे दिसून येते. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे मोरगाव जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अजित पवारांनी पक्षप्रवेश देत उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे नाराज असलेले मनोहर चंद्रिकापुरे व सूगत चंद्रिकापुरे यांनी अखेर बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीत प्रवेश केला आहे. आता, मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अजित पवारांना हा धक्का मानला जातो. 


राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी एक बंडखोरी झाली असून ती नागपुरातून आहे. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत, कोणत्याही परिस्थितीत पूर्व नागपूरमधून माझा उमेदवारी अर्ज परत घेणार नाही, असंही जाहीर करून टाकलं आहे. पक्षश्रेष्ठींनी निर्देश दिले तरीही मी पूर्व नागपूरच्या मैदानातून हटणार नाही, असं आभा पांडे यांनी म्हटले. "माझी लढत भाजप उमेदवारासोबत" आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि यंदाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी पंधरा वर्षात कोणतेही विकास काम केलेले नाही. त्यामुळे, त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी मला जनतेमधूनच आग्रह असल्याचा, दावाही आभा पांडे यांनी केला आहे.


महायुतीत भाजपच्या उमेदवाराला तिकीट


दरम्यान, आभा पांडे ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. मात्र, महायुतीतून पूर्व नागपुरात भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्या कृष्णा खोपडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तत्पूर्वीच आभा पांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. 


हेही वाचा


गोपीनाथ मुंडेंच्या परळीत 45 वर्षांनी कमळ कोमेजलं, चिन्हच नाही, भाजपला नैतिक अधिकार राहिला नाही, मनसेचा हल्ला