मुंबई: ठाकरे गटाच्या (UBT) मशाल गीतामध्ये 'जय भवानी' शब्द असल्याने निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नोटीस बजावली आहे. यावरुन उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.
जय भवानी शब्द काढा, अशी आम्हाला निवडणूक आयोगाकडून नोटीस मिळाली. आम्ही जय भवानी म्हटलं तर धार्मिक प्रचार होतो, मग मोदी, शहा जय बजरंगबली म्हणतात, ते कसं चालतं?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातातलं बाहुलं असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ऐकवली ऑडिओ क्लिप-
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभेतील भाषण ऐकवले. यामध्ये नरेंद्र मोदी बजरंग बली की जय, असं बोलून बटण दाबा,अशी बोलतानाची ऑडिओ क्लिप ऐकवली. अमित शहा यांची आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, बोलतानाची ऑडिओ क्लिप ऐकवली. यानंतर आधी मोदी-शहांवर कारवाई करा, असं आव्हान देखील उद्धव ठाकरेंनी दिलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना हवं ते बोलता येतं मग आम्हाला का नाही ? मोदी, शहांना वेगळे नियम लागू होतात का?, असं म्हणत आम्ही जय भवानी म्हणणारच, असं ठाम मत उद्धव ठाकरेंनी मांडलं.
आम्ही धर्माच्या आधारावर मत मागितले नाही-
उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाच्या नावावर मते मागतात. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यावर अद्याप निवडणूक आयोगाचे उत्तर आले नाही. ते हिंदू धर्मावर मते मागतात. आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितले नाही. निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यावे, जर आमच्यावर कारवाई करायची आहे तर मोदी-शहांवर देखील कारवाई करावी लागेल.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली
मशाल गीतात "भवानी" शब्द आल्याने निवडणूक आयोगाने नोटीस पाठवत हा शब्द हटवण्यास सांगितलं आहे. या संदर्भात आज उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मशाल गीतातील भवानी शब्द हटवणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
संबंधित बातमी:
कालची गोष्ट कालच झाली, 'त्या' प्रकरणावर बोलण्यास उद्धव ठाकरेंचा नकार