नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदी यांच्यासोबत अनेक नेते मंत्रिपदाचीही शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्त्वाकडून फोन गेलेला आहे. असे असतानाच मात्र कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि मराठवाड्यातील नेते भागवत कराड यांना मंत्रीमंडळ स्थान दिले जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये कोकण आणि मराठवाड्याचे नेतृत्त्व आता कोण करणार? या भागातून अन्य कोणत्याच नेत्याला संधी मिळणार नाही का? असे प्रश्न विचारले जात आहेत.


दिल्लीतून कराड, नारायण राणे यांना फोन 


मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नारायण राणे यांच्याकडे शूक्ष्म व लघु उद्योगमंत्री होते. तर भागवत कराड हे राज्य अर्थमंत्री होते. खरं म्हणजे नारायण राणे यांना यावेळीदेखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कारण ते कोकणातील एक मोठा चेहरा आहेत. दुसरीडे भागवत कराड हेदखील मराठवाड्यातील मोठे नाव आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष मात्र आता मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाणार नसल्याचं सांगितलं जातंय. तसा फोनदेखील भाजपच्या दिल्लीतील नेतृत्त्वाकडून कराड आणि नारायण राणे यांना गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुले आता कराड आणि राणे या दोघांचाही पत्ता कट झाल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.


मोहळ, प्रतापराव जाधव यांना संधी 


नारायण राणे आणि कराड यांना संधी मिळणार नसली तरी दुसरीकडे भाजपने राज्यात मराठा मतदारांची नाराजी लक्षात घेऊन मंत्रिमंडळात मराठा समाजाच्या नेत्यांना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुरलीधर मोहोळ, प्रतापाराव जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. आज संध्याकाळी सव्वा सात वाजता मोदी यांच्यासोबत हे नेते मंत्रिपदाची शपथ घेताना पाहायला मिळतील. 


अन्य मराठा आणि ओबीसी नेत्याला संधी


भागवत कराड हे ओबीसींचे नेते आहेत. त्यांच्या जागेवर भाजपने रक्षा खडसे यांना भाजपने संधी दिली आहे. खडसे या उत्तर महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे एका मराठा आणि ओबीसी नेत्याच्या बदल्यात दुसऱ्या मराठा आणि ओबीसी नेत्याला मंत्रिपदाची संधी देण्यात येणार आहे.


हेही वाचा :


दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?


Narendra Modi Oath Ceremony : टीम मोदीमध्ये कोण कोण, NDA च्या कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे? आतापर्यंत 37 खासदारांची नावे निश्चित