Narendra Modi Oath Taking Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. आज 40 ते 45 मंत्रि शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यातील 12 जणांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमओ कार्यालयातून आज सकाळी नव्या मंत्राना फोन जाणार आहे. त्यांना जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बोलवण्यात येणार असून त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे. मंत्रिपदाची नावे निश्चित करण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरु आहे.


 मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जातीपेक्षा प्रादेशिक समतोलावर भर दिला जाणार आहे. मंत्रिमंडळात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागातल्या खासदारांना संधी मिळणार आहे. मंत्र्यांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि शिक्षणही विचारात घेतले जात आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम आणि नितीशकुमारांच्या जेडीयूचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे तेलुगू देसमला 4, जेडीयूला 4, लोकजनशक्ती पार्टीला 2 मंत्रिपदं मिळू शकतात. तेलुगू देसम आणि जेडीयू अर्थमंत्रालयासह सभापतीपदाची मागणी करत असल्याचं समजतंय. मात्र संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र मंत्रालय भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती आहे.


राज्यातील कोणत्या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार ?


एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आज मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनाला चार मंत्रिपदे मिळू शकतात. राज्यातील भाजपचे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडून नितीन गडकरी, पीयूष गोयल, अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेनकडून मिलिंद देवरा, संदीपान भुमरे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांचं नाव आघाडीवर आहे. रिपाइंकडून रामदास आठवले हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


संभाव्य मंत्र्यामध्ये देशातून आणखी कोण कोणते नेते शपथ घेऊ शकतात ? 


मोदींच्या कॅबिनेटमध्ये 19-20 कॅबिनेट मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.भाजपच्या नेत्यांसोबत यामध्ये नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू आणि पासवान यांच्या पक्षातील नेत्यांचा समावेश असेल.  अमित शाह, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, एस जयशंकर, अश्विनी वैष्णव, ललन सिंह, रामनाथ ठाकूर, चिराग पासवान, जीतन मांझी, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, प्रल्हाद जोशी, रिरिजा सिंह, नित्यानंद राय, ज्योतिरादित्य शिंदे, मनसुख मंडविया, अनुराग ठाकूर, किरन रिजीजू, डॉ. जितेंद्र सिंह, सुरेश गोपीनाथ, शिवराज चौहान, फग्गनसिंह, कुलस्ते, शोभा करंदलाजे, खिसन रेड्डी, बंडी संजय, गजेंग्रसिंह शेखावत, अर्जुन मेघवाल हे आज मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता. 


पंकजा मुंडेंना संधी मिळणार ? 


डॉ. भारती पवार यांच्या पराभवामुळे मंत्रिमंडळात महिला चेहरा देण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठीवर दबाव असेल. त्यामुळे राज्यातून कुणाला संधी मिळणार, या  चर्चा सुरु आहे. मंत्रिपदासाठी रक्षा खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. रक्षा खडसे तिसऱ्यांदा संसदेत पोहचल्या आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. त्याशिवाय बीडमधून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यातून एका महिला नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. 



मोदींच्या शपथविधी सोहळ्याला दिग्गज राहणार उपस्थित - 


एनडीए सरकार शपथविधीसाठी भारतीय उपमहाद्वीप मधील 9 देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं आहे. 2014 मध्ये मोदी यांनी बिम्स टेक च्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केलं होतं. 2019 ला मोदी यांनी सार्क राष्ट्राच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. तर यावेळेला भारताच्या शेजारी असणाऱ्या सर्व राष्ट्रांना निमंत्रीत केलं आहे. 


येणारे प्रमुख पाहुणे


शेख हसीना, पंतप्रधान, बांग्लादेश


रनिल विक्रमासिंघे, राष्ट्रपती श्रीलंका


डॉ. मोहम्मद मुइज्जू, राष्ट्रपती मालदीव


प्रविंदकुमार जगन्नाथ, मॉरिशस


पुष्प कमल दहेल प्रचंड, पंतप्रधान नेपाळ


शेरींग तोबगे, पंतप्रधान भूटान


अहमद अफीफ, राष्ट्रपती सेशल्स