नवी दिल्ली : भाजपचे नेते तथा एनडीएचे गटनेते नरेंद्र मोदी आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या या सरकारमध्ये कोणाची वर्णी लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोंदीच्या या तिसऱ्या कार्यकाळात त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला मानाचं पान देण्यात येणार आहे. याआधी महाराष्ट्रातील चार खासदारांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असं सांगण्यात येत आहे. आता यामध्ये आणखी एका नेत्याचा समावेश झाला आहे. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदासाठी दिल्लीतून फोन गेल्याचं सांगण्यात येतंय.


मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता? 


मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा समावेश केला जाऊ शकतो. तसा कॉल त्यांना दिल्लीतून करण्यात आला आहे. तसे झाल्यास महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण सहा मंत्रिपदं येतील. दुसरीकडे भाजपचे नेते पीयुष गोयल, नितीन गडकरी, आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले, भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा होत आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद नाही? 


मिळालेल्या माहितीनुसार मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत स्थान दिले जाणार नाही. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एक मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता प्रत्यक्ष मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या एकाही नेत्याला स्थान दिले जाणार नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान यावर विचार केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.


महाराष्ट्रातून मोदी मंत्रिमंडळात कोण कोण?


- नितीन गडकरी, भाजप, विदर्भ 
- पियुष गोयल, भाजप, मुंबई
- रक्षा खडसे, भाजप, उत्तर महाराष्ट्र
- मुरलीधर मोहोळ, भाजप, पश्चिम महाराष्ट्र
- रामदास आठवले, आरपीआय
- प्रतापराव जाधव, शिवसेना, विदर्भ


हेही वाचा :


पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, प्रतापराव जाधवांचा प्रवास


मोदींना कुबड्या घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल; सामनातून संजय राऊतांचा घणाघात 


PM Modi Oath Ceremony: 'मी नरेंद्र दामोदरदास मोदी...', नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, राज्यातून 12 जणांची मंत्रिपदासाठी चर्चा