Nanded news: राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad Pawar) यांनी अमित शहांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावर सध्या भाजप नेते गिरीश महाजन (Girish mahajan) यांनी सरकारवर गंभीर आरोप केल्याचे दिसून आले.अमित भाईंनी केलेल्या आरोपामुळे शरद पवार अस्वस्थ झाले असून अमीत शहांची चूक नसताना गृहमंत्री अमीत शहांवर सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली असा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलाय.
राजकारणातील 'भ्रष्टाचाराचे सरदार' अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी छत्रपती संभाजीनगर येथून अमित शहांना जोरदार प्रत्यूत्तर दिले होते. यानंतर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी अमित शहांवर झालेली कारवाई चूकीची असून सूडबुद्धीने ही कारवाई झाल्याचं सांगितलंय.
अमित शहांवर सूडबुद्धीने सरकारची कारवाई
अमित शहांची काही चूक नसताना सूडबुद्धीने तत्कालीन सरकारने कारवाई केली आहे. उद्या तुम्ही म्हणाल अटलजीसुध्दा आणीबाणीच्या काळात जेलमध्ये होते. ते कसे पंतप्रधान झाले असे म्हणत गिरीश महाजनांनी अमित शहांवर सरकारने केलेली कारवाई राजकीय होती असा आरोप केला आहे. ते म्हणाले, अमित भाईने केलेल्या आरोपामुळे शरद पवार अस्वस्थ झाले आहेत, ते आम्ही जाणू शकतो. अनेक लोक आणीबाणीच्या काळात जेलमध्ये होते, अनेकांनी करावास भोगला आहे. उद्या तुम्ही म्हणाल अटलजी सुद्धा आणीबाणीच्या काळात जेलमध्ये होते ते कसे पंतप्रधान झाले.
ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे, त्यांच्या विचारात बदल झालेला नाही. आठ दिवसांपूर्वी अमित शाहांनी माझ्यावर टीका केली. माझ्याबाबत काहीतरी बोललं गेलं. ते म्हणाले की, देशात जेवढे भ्रष्टाचारी आहेत, त्यांचे सरदार शरद पवार आहेत. आश्चर्याची बाब आहे. गुजरात दंगल झाली होती. त्यावेळी कायद्याचा गैरवापर केला, म्हणून सुप्रीम कोर्टाने अमित शहाला तडीपार केलं होतं. तोच माणूस आज देशाचा गृहमंत्री म्हणून देशाचं रक्षण करत आहे", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते. यावर गिरीश महाजनांनी आता प्रतिक्रीया दिली आहे.
बाबाजानी दुर्राणी प्रवेशावर गिरीश महाजन म्हणाले...
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे बाबाजानी दुराणी यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन म्हणाले, हे चालूच राहणात, कोण इकडे जातात कोण तिकडे जातं निवडणुका आल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणाला तिकीट मिळणार आहे कोणाला मिळणार नाही. थोडीफार धावपळ होईल मला त्यात फार काही विशेष वाटत नाही.
संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही..
दरम्यान, गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधलाय. त्यांच्या नेत्यांना पंतप्रधान करायचं, राष्ट्रपती करावं की अमेरिकेचे राष्ट्रपती करावं हा त्यांचा अधिकार असल्याचे सांगत ते विरोधक आहेत, त्यांना म्हणू द्या काय म्हणायचे. संजय राऊत काय म्हणतात याला अजिबात महत्व नाही, ते सकाळपासून वायफळ बडबड करत असतात. संजय राऊतच्या जिभेला काही हाड नाही.वाटेल ते बोलत असतात. त्यांच्यावर बोलणं निरर्थक असल्याचे सांगत गिरीश महाजनांनी संजय राऊतांना खोचक टोला मारला.