मुंबई : राज्याला सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी तसेच सत्तेत येण्यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड चालू आहे. त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या घटकपक्षांचे शीर्षस्थ नेते अनेकवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. असे असतानाच आता पुन्हा एकदा हे नेते मंडळी आज (27 जुलै) दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दिल्लीदौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. असे असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आज दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत ते आज दुपारी बारा वाजता दिल्लीकडे रवाना होतील. त्यानंतर दिल्लीत संध्याकाळी सात वाजता एक बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आज दिल्लीकडे रवाना झाले आहेत.  


दिल्लीवारीचे नेमके कारण काय? 


एकनाथ शिंदे आज नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या महायुतीत जागावाटपावर चर्चा चालू आहे. महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. याच चर्चेचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा चालू आहे. असे असताना आता महायुतीच्या या तिन्ही सर्वोच्च नेत्यांच्या दिल्लीदौऱ्याला आता विशेष महत्त्व आले आहे. 


महाविकास आघाडीतही जागावाटपाला वेग


दुसरीकडे महाविकास आघाडीतही जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. काँग्रेस पक्षाने जागावाटपावर चर्चा करण्यासाठी अधिकृतपणे नेत्यांची निवड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्याची ताकत जास्त त्याला संबंधित मतदारसंघ हे सूत्र ठरले आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.