मुंबई : गद्दारांचा आम्ही पंचनामा केला आहे. अडीच वर्षात यांनी कसं सरकार चालवलं याचा पंचनामा यात करण्यात आला आहे. आम्ही महायुतीचं पाप उघडं करणार आहोत. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासण्याचं काम सरकारने केले आहे.  स्वतःच राजकारण कसं करायचं हेच यांच्या डोक्यात आहे. महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेवरून उतरवणार, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या (Mahayuti Government) कामकाजावर टीका करण्यात आली. 


नाना पटोले म्हणाले की, गद्दारांचा आम्ही पंचनामा केला आहे. अडीच वर्षात यांनी कसं सरकार चालवलं याचा पंचनामा यात करण्यात आला आहे. ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला तिचं लोकं आज सत्तेत आहेत. त्याच लोकांच्या भ्रष्टाचारामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही या घटनेची माफी मागितली नाही. काल तर बाबा सिद्धकी यांची हत्या करण्यात आली. सत्ताधारी पक्षातील नेते देखील सुरक्षित नाहीत. स्वतःच राजकारण कसं करायचं हेच यांच्या डोक्यात आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. 


रश्मी शुक्ला यांना असंवैधानिक पद्धतीने बसवले पदावर 


राजीनामा अनेक लोकांनी मागितला आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेवरून उतरवणार, अशी परिस्थिती आहे. स्वतःचे राजकारण आणि राजकारणाच्या पोळ्या कशा भाजता येईल. याच्यावर राज्यातल्या सरकारचा लक्ष आहे. राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना असंवैधानिक पद्धतीने पदावर बसवले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अधिकाऱ्यांचा वापर करायचा आणि महत्त्वपूर्ण पदावर यांच्या विचारांचे अधिकारी बसवायचे आणि लोकशाहीचा खून करायचा ही पद्धत महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू झाली आहे. आणि त्याचे सर्वात मोठे उदाहरण रश्मी शुक्ला आहेत. 



सरकारकडून महाराष्ट्राला काळिमा फासण्याचे काम


ते पुढे म्हणाले की, सरकारने महाराष्ट्राला काळिमा फासण्याचे काम केले आहे. खोक्यांचं सरकार राज्यात आलं त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे यांनी अद्याप दिलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या जखमेवर यांनी कायम मीठ चोळण्याचे काम केलं. त्यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. तरुण शिकलेल्या मुलामुलींचे आयुष्य बरबाद करण्याचे काम हे सरकार करत आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभवत आणण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित या निवडणुकीत सामोरे जात आहोत. महाराष्ट्राची जनता या निमित्ताने जशी लोकसभेमध्ये आमच्या बाजूने उभी होती. तसेच महाविकास आघाडीच्या बरोबर येणाऱ्या विधानसभेतही जनता राहील अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्र वाचवणे आमचं काम आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Maha Vikas Aghadi : निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीकडून 'गद्दारांचा पंचनामा' प्रकाशित!