सोलापूर : वेळेच्या आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही, ही राजकीय गुरू विलासराव देशमुख यांची शिकवण मी डोक्यात ठेवली आहे. माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचे ते होईल, असे म्हणत नाना पटोले यांनी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत (Chief minister) आशावादी असल्याचे संकेत आज विठ्ठल मंदिरातून दिले आहेत. नाना पटोले विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात चक्क भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा घातली, त्यानंतर नानांनी थेट ही वीणा गळ्यात घेऊनच देवाचे दर्शन घेतले. याबाबत नाना पटोलेंना (Nana Patole) विचारले असता हा फेटाही कार्यकर्त्यांनी घातला आणि वीणाही कार्यकर्त्यांनी घातल्याचे सांगत नशिबात जे असेल ते होईल, असे नानांनी म्हटले आहे. त्यामुळे, आता महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नानांच्या या कार्यकर्ता प्रेमावरुन वादाची ठिगणी उडते की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  


मला सध्या पेटत असलेला महाराष्ट्र शांत करायचा आहे, महाराष्ट्राला पूर्वीचे सोन्याचे दिवस आणायचे आहेत. माझी लढाई खुर्चीची नाही तर महाराष्ट्राच्या विकासाची आणि जनतेच्या हिताची असल्याचे नानांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. 


लोकसभेच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून आज नाना पटोले आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी आले असता त्यांच्या गळ्यात चक्क भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा घालण्यात आली. नाना पटोले हे पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि धवलसिंह मोहिते पाटील मित्रमंडळ यांच्याकडून भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारी वीणा नाना पटोले यांच्या गळ्यात घालण्यात आली. विधानसभा निवडणुका जवळ येत असताना आता नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून थेट पंढरीच्या वारीत झालेल्या उल्लेखाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कारण, महाविकास आघाडीमध्ये अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही, किंवा मविआमधील कोणत्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणार, हेही निश्चित झालेलं नाही.        


भुजबळ-पवार भेटीवरही भाष्य


राज्यातील शिंदे सरकारवर सडकून टीका करत, राज्य सरकारनेच महाराष्ट्र पेटवला असा थेट आरोप पटोले यांनी केला आहे. सरकार सत्ता चालवायच्या लायकीचे नाही, आज त्यांच्याच एका जेष्ठ मंत्र्यांनी हे दाखवून दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भुजबळ आणि पवार यांच्या आजच्या भेटीचा उद्देशच तो होता, हे सरकार लायकीचे नाही हेच त्यांनी दाखवून दिल्याचं पटोले यांनी म्हटलं.  


संघर्ष संपवायचे सोल्यूशन आमच्याकडे


मराठा-ओबीसी संघर्ष संपवायचे सोल्युशन आमच्याकडे आहे, तुम्हाला जमत नसेल तर ते आम्ही करतो. त्यासाठी पहिल्यांदा  जातनिहाय जनगणना करावी लागेल, त्यानंतरच हे सर्व प्रश्न सुटू शकतील. मात्र, पंतप्रधान मोदी तयार नसल्याने हा वाद संपणारच नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला. या वादात सरकारच पेट्रोल टाकत असल्याची परिस्थिती आपण पाहत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगितले होते, मग द्या आता, असेही पटोले यांनी म्हटले. तर, यावर मार्ग आहे, मात्र या सरकारला मार्गच काढायचा नसल्याचा आरोपही पटोले यांनी केला.