Nana Patole : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत 13 खासदारांसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फक्त १६ जागा निवडून आणता आल्या. यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पदमुक्त होण्यासाठी दिल्लीत हायकमांडकडे पत्रव्यवहार केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्याचे देखील बोलले जात आहे.  आता या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलंय.   


काँग्रेसच्या अंतर्गत वादाबाबत नाना पटोले म्हणाले की, राजकीय पक्षामध्ये सर्व गोष्टी चालतात. मोदी आणि फडणवीसांवरही भाजपचे लोक आक्षेप घेतात. हे फक्त काँग्रेसमध्ये चालतं, असं नाही, सर्वच पक्षात अशा गोष्टी चालतात. पक्षांतर्गत बाबी पक्षांतर्गत सोडवल्या जातात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


ही जबाबदारी सर्वांची 


जे राज्यातले प्रमुख नेते असतात, त्यांची जबाबदारी असते. ते पराभवासाठीही जबाबदार असतात आणि विजयासाठीही जबाबदार असतात, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. याबाबत नाना पटोले म्हणाले की, ही जबाबदारी सर्वांची आहे, विषय श्रेयवादाचा नाही तर आत्मचिंतनाचा आहे. महाराष्ट्राची जनता बॅलेटवर मतदानाची मागणी करत आहे. या मुद्द्यावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. आमच्या मतावर निर्माण होणारे सरकार आम्हाला दिसलं पाहिजे, अशी राज्याच्या जनतेची भावना आहे. लोकांची ती लढाई लढणे आता आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  


खुल्या पद्धतीने चर्चा करण्याची गरज नाही


राजीनाम्याबाबत नाना पटोले म्हणाले की, हा आमच्या पार्टीचा अंतर्गत इश्यू आहे. खुल्या पद्धतीने त्याची चर्चा करण्याची गरज नाही. काँग्रेस पक्ष वेळोवेळी जे निर्णय घेते, ते तुम्हाला कळवले जाते, आता घेतलेले निर्णय तुम्हाला कळेलच, असे त्यांनी म्हटले. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदाला सोडचिठ्ठी देऊन या पदासाठी दावा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत विचारले असता चर्चा कोणीही काहीही करू शकते, त्याला थांबवता येत नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची माझी आजवरची परंपरा आहे. पक्षाचा आदेश सर्वांना मान्य असेल, असे त्यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


Vijay Wadettiwar: विधिमंडळ पक्षनेता होण्यासाठी नाना पटोले राजीनाम्याच्या तयारीत? विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं म्हणाले, 'तो निर्णय आम्ही...'