Raju Patil Meet Devendra Fadnavis मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळपासून चांगलीच वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. 


राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र फडणवीसांच्या घरी पोहचत असताना याचदरम्यान मनसेचे माजी आमदार राजू पाटील (MNS) देखील सागर बंगल्यावर पोहचले. आज सकाळी राजू पाटील यांची गाडी सागर बंगल्यावर आल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगू लागली. मात्र मुलाच्या लग्नाची पत्रिक देण्यासाठी राजू पाटील सागरवर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले होते. राजू पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना मुलाच्या लग्नाचे आमंत्रण दिले. 


मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू-


आमदार प्रकाश सोलंकी सागर बंगल्यावर दाखल आहेत. आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. शिवसेनेचे आमदार संजय राठोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. मंत्रिपदासाठी काही नेते वारंवार पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेत होते, त्यामुळे आता कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


सागर, वर्षा बंगल्यावर वर्दळ वाढली-


शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल झाले होते. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पहायला मिळेल अशी चर्चा आहे. नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना एकनाथ शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागर बंगल्याचे उंबरठा झिजवताना पहायला मिळत आहेत. यावेळी उदय सामंतही वर्षावर पोहचले होते. 
शिवसेनेचे संभाव्य मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोनच्या प्रतिक्षेत आहेत. उद्या नागपूरमध्ये होणाऱ्या मंत्री मंडळ विस्तारात शपथ घेणारे संभाव्य मंत्री अधिकृत फोनच्या प्रतिक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे. 




संबंधित बातमी:


Maharashtra Cabinet Expansion: पंकजा मुंडे, नितेश राणे, माधुरी मिसाळ ते आशिष शेलार, गोपीचंद पडळकर; भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी