China Coronavirus Updates : चीनमध्ये ( China ) कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाताना दिसत आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्यादेखील वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. कोरोना प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रुग्णालयामध्ये औषध आणि खांटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या कोरोना लाटेमध्ये चीनमधील 60 ते 70 टक्के जनता कोरोनाच्या विळख्यात सापडेल असं सांगितलं जात आहे. कोरोनामुळे 20 लाख मृत्यू होण्याची शक्यताही आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.


कोरोना रुग्णांमध्ये 80 ते 90 टक्के वाढ


चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांमध्ये 80 ते 90 टक्के वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणातही प्रचंड वाढ झाली आहे. चीनमध्ये मृत्यूचं तांडव सुरु असल्याचं म्हटलं जातं आहे. चीनमधील कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचा ढीग साचल्याचे रुग्णालयातील व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.


कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचा ढीग, व्हिडीओ व्हायरल


चीनमध्ये रुग्णालयांमध्ये खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. खाटांअभावी रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचीही कमतरता आहे. औषध आणि ऑक्सिजनचे संकटही गडद होऊ लागले आहे. याचे अनेक व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. या व्हिडीओंवरून चीनमधील कोरोना संकट किती गडद आहे, याची जाणीन होईल.


पाहा व्हायरल व्हिडीओ : चीनमध्ये मृतदेहांचा खच; रुग्णांसाठी खाटांचा अभाव






दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. इतके मृत्यू झाले आहेत की मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागाच उरलेली नाही. मृतदेह खोलीपासून रुग्णालयाबाहेर ठेवण्यात येत आहेत. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तज्ज्ञांचा दावा आहे की येत्या दोन ते तीन महिन्यांत चीनमधील 800 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते.


चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याचं पाहायला मिळालं. यानंतर सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात पुन्हा कठोर निर्बंध लावत लॉकडाऊन जारी केला. सरकारने झिरो कोविड धोरण लागू केल्यानंतर चीनमधील जनतेचा आक्रोश पाहायला मिळाला. नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधत निदर्शने आणि आंदोलन करत सरकारला निर्बंध हटवण्यास सांगितलं. यानंतर चीन सरकारने कोविड निर्बंधांमध्ये सूट दिली. मात्र यानंतरच चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे.