Chandrashekhar Bawankule On Pankaja Munde : 'मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष थोडीच माझा आहे', असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केल्यानंतर चर्चांना उधाण आलं. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. पंकजाताई भाजप माझ्या पाठिशी आहे, असंच म्हणाल्या, असं बावनकुळे म्हणाले. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिल्या.


दिल्लीत आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी भाजपची आहे, पण भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही. त्यांच्या याच वक्तव्यावरुन विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत."


'पंकजाताई थोडंही बोलल्या तर त्याचा विपर्यास केला जातो' 


त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास आहे. मी त्यांचं संपूर्ण भाषण ऐकलेलं आहे. पंकजाताई यांनी भाजपबद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य केले आहे. पंकजाताई भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. पंकजाताई ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत, पक्षाच्या जनसंपर्क अभियानात त्या सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशात त्यांच्या अनेक सभा होत आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयाला धरुन त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चूक आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नेहमी बोलत असतो. त्या थोडंही बोलल्या तर त्याचा विपर्यास केला जातो असं मला वाटतं."


आमचा पक्ष महासागर


भाजपमधील इनकमिंगविषयी बोलताना आमचा पक्ष महासागर असल्याचं बावनकुळे म्हणाले. "आमचा पक्ष महासागर आहे, अरबी समुद्रासारखा आहे. या महासागरामध्ये कितीही लहान, कितीही मोठा, कोणत्याही पक्षातला नेतृत्व आला तरी आमच्याकडे खूप स्पेस आहे. आमच्याकडे समाजातील प्रत्येक घटकासाठीचे वेगवेगळे सेल आहेत. पस्तीस प्रकोष्ठ आहे. किसान आघाडी, महिला आघाडीसारख्या नऊ आघाड्या आहेत. 48 लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 288 जागा युती म्हणून लढायच्या आहे. त्यामुळे कोणीही पक्षात आला तरी त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला काम देण्यासाठी आमच्याकडे स्पेस आहे, जागा आहे. ज्या ज्या पक्षातील ज्या ज्या नेत्यांना भाजपमध्ये यायचं असेल, माझी त्यांना विनंती आहे, त्यांनी भाजपमध्ये यावं आम्ही महासागरासारखं त्यांना सामावून घेऊ," असं बावनकुळे यांनी म्हटलं.


'ओबीसींच्या मतांसाठी राष्ट्रवादीकडून मेळावे'


राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मेळाव्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं. "सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसींसाठी काहीही केलं नाही म्हणून आज त्यांना ओबीसी मेळावे घ्यावे लागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राष्ट्रीय ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात ओबीसी मंत्रालय आणि महाज्योती निर्माण झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा सुटला. नाहीतर अजित पवारांनी तर त्या संदर्भातील निधीची फाईल फेकून दिली होती. शिंदे-फडणवीस सरकारमुळे ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आरक्षण मिळालं. सत्तेत असताना काही केलं नाही आणि आता ओबीसीच्या मतांसाठी ओबीसी समाजाचे मिळावे घेत आहेत. 


'राज्यातील तीन कोटी कुटुंबांशी संपर्क साधणार'


30 मे ते 30 जून आम्ही जनसंपर्क अभियान चालवत आहोत. केंद्राचे अनेक नेते अभियानात महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रातील नेते प्रत्येक मतदारसंघात जाऊन संपर्क साधणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही राज्यातील तीन कोटी कुटुंबांना संपर्क करणार आहोत. हे आमचा घर चलो अभियान आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या अभियानाबाबत दिली.


संबंधित बातमी