MVA Seat Sharing, Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीच्या (MVA) जागावाटपासंदर्भात (Seat Sharing) रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे जागावाटप पूर्ण होत नसतानाच वंचित (Vanchit) आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याकडून मविआविरोधातच सुरु असलेल्या वक्तव्यांमुळे नेत्यांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची नेमकी भूमिका काय आहे आणि मागील काही दिवसात कोणत्या गोष्टींमुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे, यासंदर्भात स्पेशल रिपोर्ट वाचा.
मविआत जागा वाटपावरून गुंता वाढला
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याकडून महाविकास आघाडीविरोधात करण्यात आलेल्या या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण होत आहे. स्वतंत्र लढणार असल्याचं वंचितकडून वारंवार सांगितलं जातं आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपात आपसात रस्सीखेच सुरु आहे. अशात, त्यांच्या वाट्याला किती जागा येतील, याची शाश्वती नाही. आघाडीतील जागावाटप अंतिम झालेलं नसल्याने वंचितला कोणत्या जागा मिळणार हे स्पष्ट नाही. यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर गुंता वाढला आहे.
आंबेडकरांचा मविआविरोधात असल्याचा सूर
महाविकास आघाडीतील (MVA Seat Sharing) चर्चा सुरु असतानाही प्रकाश आंबेडकर पत्र लिहित भूमिका जाहिर करत आहेत, या सर्व भूमिका महाविकास आघाडीविरोधात असल्याचा सूर आहे. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची नाराजी वाढत चालली आहे. प्रकाश आंबेडकर आमच्याशी वाटाघाटी न करता थेट भूमिका घेत असल्याने चर्चेतील अडथळे वाढू लागलेत. त्यातच दोन बैठकांना निमंत्रण न दिल्याने त्यांनीही कुरघोडीला सुरुवात केली.
महाविकास आघाडीचं जागा वाटप खोळंबलं
महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे, मात्र वंचितकडूनच अद्याप कोणत्या जागा हव्यात यासंदर्भात स्पष्टोक्ती करत नसल्याने जागा वाटप खोळंबले आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून वंचितला दोन-तीन जागांचा प्रस्ताव असल्याने वंचितच्या गोटात नाराजी वाढली आहे.
आव्हाड आणि आंबेडकर यांच्यात शीतयुद्ध
वंचितकडून महाविकास आघाडीत घ्यावं यासंदर्भात पत्र व्यवहार केले गेलेत. सोबतच, महाविकास आघाडीच्या बैठकीवेळी धैर्यवर्धन पुंडकर यांना बाहेर बसवल्याने नाराजीनाट्य दिसलं. जितेंद्र आव्हाड आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात शीतयुद्ध रंगताना दिसलं. अशात, आता थेट काँग्रेसवरच प्रकाश आंबेडकर निशाणा साधत असल्याने नेमकं प्रकाश आंबेडकर यांच्या मनात चाललं तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :