मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. महाविकास आघाडीचं जागावाटप दसऱ्याला जाहीर होण्याची शक्यता आहे. मविआच्या जागा वाटपाच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. मुंबईत विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. मुंबईतील जागा वाटपाचा तिढा देखील अद्याप सुटलेला नाही. भायखळा, वर्सोवा आणि वांद्रे पूर्व या तीन जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं दावा केला आहे. या तीन जागांवरील निर्णय न झाल्यानं मविआचं मुंबईतील जागावाटप अंतिम झालेलं नाही, यासंदर्भातील वृत्त द इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रानं दिलं आहे. 


कोणत्या जागांवर दोन पक्षांचा दावा


मुंबईतील भायखळा, वांद्रे पूर्व आणि वर्सोवा या तीन जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही. याशिवाय घाटकोपर पश्चिम, जोगेश्वरी आणि मागाठाणे या जागांबाबत देखील अंति मनिर्णय झालेला  नाही. मविआतील सूत्रांनुसार घाटकोपर पश्चिम, जोगेश्वरी आणि मागाठाणेचा तिढा लवकर सुटेल असा विश्वास नेत्यांना आहे. मुंबईतील 36 पैकी जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे.


2019 मध्ये शिवसेना एकसंध असताना भायखळा येथून यामिनी जाधव एमआयएमच्या वारिस पठाण यांचा पराभव करुन आमदार झाल्या होत्या. वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांनी सेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला होता. वर्सोवाच्या जागेवर भाजपच्या भारती लव्हेकर आमदार आहेत. या तीन जागांवर सेना आणि काँग्रेसचा दावा आहे. 


भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या आहेत. या जागेवर ठाकरेंच्या सेनेचा दावा आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेविका गीता गवळी यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती. वर्सोवा मतदारसंघात 2019 ला काँग्रेसचे माजी आमदार बलदेव खोसा यांचा पराभव झाला होता. तितं सेनेच्या राजूल पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. काँग्रेसचा या जागेवर दावा असून इथं ठाकरेंच्या सेनेचा देखील दावा आहे. 


वांद्रे पूर्व मतदारसंघात 2019 ला काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. त्यांनी सेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला होता.सेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांच्या अपक्ष उमेदवारी मुळं तीन प्रमुख उमेदवार रिंगणात होते. मतविभाजनचा फायदा होऊन झिशान सिद्दीकी विजयी झाले. सध्या ते ते काँग्रेससोबत नाहीत. त्यामुळं या जागेवर ठाकरेंच्या सेनेचा दावा आहे. वरुण सरदेसाईंकडे या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मविआच्या नेत्यांचा चर्चा करुन या जागांबाबतचा तिढा सोडवता येईल असा विश्वास आहे. 


इतर बातम्या :


ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या