Sanjay Jadhav vs Mahadev Jankar : परभणी : परभणी (Parbhani News) जिल्ह्यात तिन्ही पक्षात एकही उमेदवार नव्हता का? साताऱ्याहून (Satara News) याला इथं आणलं, हे मायबापांनाच 5-5 वर्ष भेटत नाही तर मतदारांना काय भेटणार, अशी टीका महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्यावर परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी केली आहे. याशिवाय भाजपला (BJP) जाती जातीत, धर्मात, माणसा माणसात भांडण लावून आपली पोळी भाजून घायची आहे, अशी सणसणीत टीका परभणीच्या जिंतूरमध्ये (Jintur News) केली आहे. 


जिंतूर येथे आज महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ संयुक्त प्रचार बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना संजय जाधव यांनी महादेव जानकर आणि भाजपला जोरदार लक्ष्य केलं आहे. इथला उमेदवार घटना बदलण्याची भाषा करतो,मायबापांनाही भेटत नाही, असं म्हणतो. मग जो मायबापांनाच भेटत नाही तर मतदारांना काय भेटणार? असा टोला त्यांनी लागवला आहे. तसेच, भाजपनंही निवडणूक निव्वळ जातींवर आणून ठेवली आहे. यांना माणसांत माणूस, जातीत जात, धर्मा धर्मांत तेढ निर्माण करून भांडण लावायची आहेत. आणि आपली पोळी भाजून घ्यायची आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे.


आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराजवळ मतं मागायला काही जागाच नाही : संजय जाधव 


संजय जाधव बोलताना म्हणाले की, "आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराजवळ मतं मागायला काही जागाच नाही. कोणत्या नावानं मतं मागणार आहेत? कोणाचं काही देणं नाही, घेणं नाही. याचं गाव कुठे आहे काहीच माहीत नाही, पण आता आलाय तर खरा. मग मतं मागायची कशी, मग मतांचं ध्रुवीकरण करायचं काम हे कोण करत असेल तर भारतीय जनता पार्टी. त्यांना जो समाज एकत्र नांदतोय त्याला नांदू द्यायचं नाही. जाती जातीत तेढ निर्माण करायचा आहे." 


"आपण सर्वांनी हुशारीनं वागलं पाहिजे, येणारा काळ आपल्यासाठी उज्वल काळ आहे. हे सरकार उलथवून टाकणं आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. एकीकडे उमेदवार संविधान बदलण्याचीच भाषा करतोय. एकीकडे मी पाच-पाच वर्ष मायबापांना भेट नाही असं म्हणतोय. पाच वर्ष मायबापांनाच भेटत नाही, मग तू मतदारांना काय भेटशील? आज परभणीत महायुतीत एकही माणूस नव्हता का? महादेव जानकरांसारखा सातारा जिल्हातील माणूस इथे उमेदवार होतो. ही आमच्यासाठी शोकांतिका आहे. उद्या तुम्ही सगळे साताऱ्याला जाणार का?", असा थेट सवाल संजय जाधव यांनी उपस्थित केला आहे.