Mumbai South Lok Sabha Constituency : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची होणार आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्याकडून अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जातेय. तर भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचं समोर आले आहे. त्यामुळे दोन कोकणी चेहऱ्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. 


शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि भाजपकडून मराठी आणि कोकणी मते स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे वारंवार लालबाग-परेल मध्ये  बैठका घेत आहेत. तर राहुल नार्वेकर शेवटच्या टप्प्यात लालबाग परेल शिवडी वरळी मधील रखडलेली कामे  मार्गी लावत आहेत.  


राहुल नार्वेकरांकडून संकेत - 


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून, दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. अबकी बार 400 पार...आगमी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे हे स्लोगन...हेच चारशे पार करण्यासाठी भाजप प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा बारकाईनं अभ्यास करतंय. कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचं हे आता भाजपचे जवळपास निश्चित झालं असून, दक्षिण मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झालीय.तसे संकेतच खुद्द राहुल नार्वेकर यांनी दिलेत.पक्ष जी संधी देईन ती मी पार पाडीन असे खुद्द नार्वेकर म्हणालेत.


राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा का ?


 सगळ्यात महत्वाचे म्हणजे राहुल नार्वेकर यांनी सध्या शिवडी, वरळीचे दौरे सुरू केली असून, त्यांनी उबाठा गटाच्या आमदारांवर जोरदार टीका केलीय. राहुल नार्वेकर यांच्याच नावाची या मतदारसंघासाठी का चर्चा सुरू झाली? दक्षिण मुंबई हा मुंबईतील संमिश्र वस्ती असलेला मतदारसंघ आहे. मराठी, गुजराती आणि मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असलेल्या या मतदारसंघात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. सावंत हे उत्तम लोकसंपर्क असलेले लो-प्रोफाइल कामगार नेते आहेत. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. मागील दहा वर्षांपासून खासदार असलेल्या सावंत यांचा मतदारसंघात जम बसला आहे. त्यांना टक्कर द्यायची असेल तर तितकाच तगडा आणि कोकणी उमेदवार दिला पाहिजे असे भाजपला वाटतंय. याचमुळे उच्चशिक्षित, तरुण आणि कोकणी चेहरा हे समीकरण बघता राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झालीय..


महायुतीमध्ये मुंबईतील चार जागा भाजपकडे ?


लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत भाजप चार तर शिवसेना एकनाथ  शिंदेंना गटासाठी दोन जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईची जागा लढवण्यावर ठाम आहे. तर शिवसेनेला उत्तर पश्चिम मुंबई, आणि  दक्षिण मध्य मुंबईची जागा सोडण्याची शक्यता आहे.  


6 जणांची समिती - 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांची समिती महाराष्ट्रासाठी केंद्रीय भाजपनं नेमली आहे. या सहा जणांच्या समितीकडे संभाव्य उमेदवार निवडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या समितीच्या आतापर्यंत दोन बैठका पार पडल्याचं समजतेय. त्यामध्ये काही जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचेही समजतेय. त्यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांचं नाव जवळपास निश्चित झालेय.  


शिवसेनेचा पारंपारिक मतदार भाजपला स्वीकारणार?


दक्षिण मुंबई मतदारसंघात मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र लालबाग, काळाचौकी, शिवडी आणि परळ भागांत मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. हा शिवसेनेचा पारंपारीक मतदार आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर  त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघातील हा भलामोठा मराठी पट्टा कितपत स्विकारेल हा मोठा प्रश्नच आहे. लालबाग, परळ म्हणजे, एकंदरीत संपूर्ण गिरणगाव गेल्या कित्येत वर्षांपासून शिवसेना आणि विशेषतः ठाकरेंशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे या पट्ट्यात भाजपला  कितपत पसंती मिळेल हा प्रश्नच आहे. अशातच इथे मनसेनं उमेदवार दिला, तर मात्र समीकरण काहीसं बदलू शकतं. आता काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.