Mumbai North Election Result 2024 मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर सर्वात वादग्रस्त ठरलेला मतदारसंघ म्हणजे मुंबईतील उत्तर-पश्चिम (Mumbai North-west) मतदारसंघ होय. येथील मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना झाला. त्यामध्ये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे, मतमोजणीवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील रवींद्र वायकर (Ravindra Waikar) विरुद्ध अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या निवडणूक लढाईचा वाद उच्च न्यायालयात (High court) पोहोचला आहे. याचदरम्यान उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावरील गोंधळ संदर्भात एक महत्वाची माहिती 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे.


मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरणारे रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांच्याकडे दोन उमेदवारांच्या नावे पोलिंग एजंटचे कार्ड असल्याचा आरोप अपक्ष अमेदवार भरत शाह यांनी केला आहे. रवींद्र वायकर आणि एक अपक्ष उमेदवार या दोन्हीकडून एक पोलिंग एजंट दोन उमेदवारांचे आयकार्ड घेऊन मतमोजणी केंद्रावर काम करत असल्याचा आरोपही भरत शाह यांनी केला आहे. त्यामुळे पोलिंग एजंट आयकार्डवर रवींद्र वायकरांचं काम केलं जात होतं का?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र मंगेश पंडिलकरला एकच पोलिंग एजंटचे आयकार्ड दिल्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. रवींद्र वायकर यांचा नव्हे, तर एका अपक्ष उमेदवारांच्या पोलिंग एजंटच्या आयकार्डवर मतमोजणी केंद्रावर पंडीलकर उपस्थित असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. 


उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नेमकं काय म्हटलंय?


भरत शाह यांनी दाखल केलेल्या याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोगासह, मुंबई उपनगर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी, रवींद्र वायकर तसेच राज्याचे पोलीस महासंचालक यांनाही प्रतिवादी करण्यात आलंय. या मतमोजणीत सातत्यानं आघाडीवर असलेल्या अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषित केल्यानंतर पोस्टल बॅलेटची पुनर्मोजणी करण्याची मागणी रवींद्र वायकर यांच्यातर्फे करण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी रात्री उशिरानं रवींद्र वायकर यांना अवघ्या 48 मतांनी विजयी घोषित केलं, जे चुकीचं असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याशिवाय याचिकेतून निवडणूक अधिकारी कार्यालयात तात्पुरत्या सेवेत असलेल्या दिनेश गुरव या व्यक्तीचा मोबाईल फोन प्राजक्ता वायकर-महाले आणि नंतर मंगेश पांडिलकर यांनी मतमोजणीच्या वेळी वापरण्यावरही आक्षेप घेतलेला आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयात दिनेश गुरव या व्यक्तीची तात्पुरती झालेली नेमणूक योग्य आहे का?, अश्या प्रकारे खासगी कंपनीतील व्यक्तीची तिथं नेमणूक होऊ शकते का?, निवडणूक आयोगासोबत कार्यरत व्यक्ती मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन जाऊ शकते का? असे प्रश्न याचिकेतून उपस्थित केले आहेत.


4 जूनला नेमकं काय घडलं?


मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला. याआधी अमोल कीर्तिकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली.  आता कीर्तिकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली. अमोल किर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.


संबंधित बातमी:


रवींद्र वायकर मतदारसंघात जिंकले, आता हायकोर्टात लढावं लागणार; 48 मतांच्या विजयाविरुद्ध याचिका दाखल