Mumbai Marathon 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मॅरेथॉन 2023 ची घोषणा केली आहे. मुंबई मॅरेथॉन ही आशियातील प्रतिष्ठित मॅरेथॉन स्पर्धा मानली जाते. यंदाचं हे 18 वं वर्ष असून यंदाची मॅरेथॅान स्पर्धा 15 जानेवारी 2023 रोजी होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ही उपस्थित होते.  


सतरा वर्षांपासून आयोजित होणाऱ्या या टाटा मुंबई मॅरेथॉनने मुंबई आणि भारताच्या अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. फिजिकल आणि व्हर्चुअल रेसेससाठी 19 ऑगस्ट 2022 पासून नोंदणी सुरू होणार आहे. मुंबई मॅरेथॉनसाठी नोंदणी 11 ऑगस्ट 2022 रोजी ठिक सकाळी 7:00 वाजल्यापासून सुरु होणार आहे. यासाठी sattatamumbaimarathon procam.in वर नोंदणी करता येईल. दरवर्षी मुंबई मॅरेथॅानमध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी होत असतात. तसेच बॅालिवूड कलाकारही आपली उपस्थिती दर्शवितात. त्यामुळे मुंबई मॅरेथॅानला एक वेगळं ग्लॅमर आहे. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे ही मॅरेथॅान होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात ही मॅरेथॅान स्पर्धा पार पडेल. 'हर दिल मुंबई' अशी टॅग लाईन या मॅरेथाॅनची स्पर्धा पार पडणार आहे.


'मी तर 30 वर्षांच्या मॅरेथॅाननंतर मुख्यमंत्री झालो आहे'


यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय फटकेबाजी ही केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''आम्ही धावतो आणि धावायला लावतो. पण आम्ही धावत असतो. दिवस रात्र धावतो म्हणून यशस्वी होतो. आम्ही जी शर्यत खेळत होतो. त्यात अनेकांना वाटलं होतं की, आम्ही अयशस्वी होऊ. पण आम्ही जिंकलो. मी तर 30 वर्षांच्या मॅरेथॅाननंतर मुख्यमंत्री झालो आहे. आता आम्हाला हाफ मॅरेथॅानचं तिकिट मिळालं आहे. कारण अडीच वर्ष आहेत ना. पुढच्या वर्षी आम्ही फुल मॅरेथॅान जिंकू.'' मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही पण एक मॅरेथॅान खेळून आलो आहोत. मुंबई व्हाया सूरत गुवाहाटी, अशी आमची शर्यत होती. पण परत आलो आणि जिंकून आलो. हे पण महत्वाचं आहे.


'मुंबई मॅरेथॉनमध्ये रतन टाटा यांचं मोठं योगदान'


प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ''काही दिवसांपूर्वीच मी रतन टाटा यांना भेटलो. ते मला म्हणाले होते की, आम्ही सरकाराच्या खांद्याला खांदा लावून हे राज्य पुढे वाढवण्यासाठी काम करू. मी म्हणालो, तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे.'' शिंदे म्हणाले की, ही मोठी गोष्ट आहे की, त्यांचं योगदानही टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये खूप मोठं आहे.