BJP on Uddhav Thackeray : आगामी लोकसभेच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे जागावाटपाची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena UBT) कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जाहीर सभांमधून भाजपवर जोरदार टीका करत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून देखील ठाकरेंना जशाच तसे उत्तर दिले जात आहे.  


अबकी बार भाजप तडीपार, यांना तडीपार केल्याशिवाय काहीही होणार नाही. तडीपारीची नोटीस त्यांना दिली आहे. आता त्यावर सही तुम्हाला करायची आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे. यावरून मुंबई भाजपने (Mumbai BJP) उद्धव ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे. 


व्यंगचित्र ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं


व्यंगचित्र ट्विट करत मुंबई भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.उद्धव ठाकरेंच्या आयडॉलॉजीवर मुंबई भाजपने टीका केली आहे. रोज गळ्यात नवा हार, आयडॉलॉजी तडीपार असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या व्यंगचित्राचे ट्विट करण्यात आले आहे. आता मुंबई भाजपच्या या टीकेला ठाकरे गट कशा प्रकारे उत्तर देणार ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


 






 


अबकी बार भाजप तडीपार - उद्धव ठाकरे 


गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने युतीचे 42 खासदार निवडून दिले नसते तर भाजपला दिल्लीचे तख्त राखता आले नसते. पण आता भाजपचे तख्त फोडावेच लागेल. अबकी बार भाजप तडीपार, हा आपला नारा असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते लोकसभेट 400 जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. पण तुम्ही कसे 400 पार होता, हे मी बघतोच, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 


नितीन गडकरींच्या बाजूने उद्धव ठाकरेंनी तुफान फटकेबाजी


भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नाव आहे. पण सुरुवातीला आम्हाला मोदी, शाह ही नावं माहिती नव्हती. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी आम्हाला भाजपची ओळख करुन दिली. यानंतर त्यांच्यासोबत नितीन गडकरी आले. गडकरी एक चांगलं काम करणारा माणूस आहे. नितीन गडकरी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. पण भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत त्यांचे नाव नाही. भाजपने पूर्वी मुंबईतील ज्या कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचे आरोप केले होते त्यांनाच उमेदवारी दिली आहे, अशी टीका त्यांनी केली. 


आणखी वाचा


Lok Sabha 2024 : मविआचं ठरलं! जळगाव, कोल्हापूरचा तिढा सुटला; आता रामटेक, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून चुरस