मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरु झाले. अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करणारा मॉरिस नोरान्हो याने चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माफियागिरी आणि गुंडगिरीला पाठबळ देत असल्याचा आरोप केला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांचे खंडन केले. अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम केले जात आहे. मात्र, उबाठा गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली आहे. या दोघांमध्ये मी नगरसेवक होणार की तू नगरसेवक होणार, हा वाद होता. यामधून हा प्रकार घडल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी केले.


आजपर्यंत 'सामना' या दैनिकातून मॉरिस नोरान्हो याचे उदात्तीकरण करण्यात आले. 'सामना'तून वेळोवेळी मॉरिस नोरान्होच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता. मॉरिसच्या कामाला 'सामना'तून तर घोसाळकर कुटुंबीयांच्या कामाला मातोश्रीवरुन पाठिंबा दिला जात होता. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणे चूक आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले.


मॉरिस आणि घोसाळकरांना कॉम्प्रोमाईज करायला सांगणाऱ्या व्यक्तीला शोधले पाहिजे: उदय सामंत


अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर मुख्यंत्र्यांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे. त्याऐवजी मॉरिस नोरान्हो आणि अभिषेक घोसाळकर यांना आपापसात समझोता करायला लावणारी व्यक्ती कोण,याचा शोध घेतला पाहिजे. या दोघांना फेसबुक लाईव्ह करायला सांगून तुमच्यातील वाद मिटवा, असे कोणी सांगितले होते? घोसाळकर आणि नोरान्हो यांच्यात समझोता झाला होता. मात्र, हे दोघे आमचे कार्यकर्ते नव्हते. या दोघांनी उबाठामध्ये एकत्र काम करुन पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट पोलिसांनी तपास करताना लक्षात घेतली पाहिजे. फेसबुक लाईव्हपूर्वी या दोघांची कोणाशी चर्चा झाली होती, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही उदय सामंत यांनी केली.


उदय सामंतांकडून एकनाथ शिंदेंचा भक्कम बचाव


गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून गुन्हेगारीच्या घटनांवरुन मुख्यमंत्र्यांना वारंवार लक्ष्य केले जात आहे. अभिषेक घोसाळकर याची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्हो यानेही वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांचा भक्कमपणे बचाव करताना मॉरिस नोरान्हो हा कशाप्रकारे ठाकरे गटाशीच संबंध होता, हे सविस्तरपणे सांगितले. त्यासाठी उदय सामंत यांनी 'सामना' दैनिकातील कात्रणे प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. या माध्यमातून सामंत यांनी घोसाळकर यांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत वादातूनच घडल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.


 


आणखी वाचा


ठाकरेंचे कट्टर समर्थक, मॉरिसभाई सोबत राजकीय वैर, कोण होते अभिषेक घोसाळकर?


एकनाथ शिंदे सरकारी पैशाने माफियांना पोसतायत, गुंडगिरीला बळ देतायत; राऊतांची घणाघाती टीका