Money Laundering Case: मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच या कटामागेच 'मास्टर माईंड' आहेत. भ्रष्टाचारातून मिळवलेल्या वारेमाप संपत्तीचा स्त्रोत काय?, याचं देशमुखांना स्पष्टीकरण देता आलेलं नाही, असा दावा अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) देशमुखांच्या जामीन अर्जाला विरोध करत हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे देशमुखांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
ईडीच्यावतीनं सहाय्यक संचालक तसिन सुलतान यांच्यावतीनं ईडीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी उत्तरादाखल हे 56 पानी प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. देशमुख हेच या मनी लॉन्ड्रिंगच्या कटामागेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठी अधिकृतपणे आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे. पोलीस दलातील अधिकार्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग तसेच पोलीस अधिकार्यांच्या कामगिरीवर अवाजवीपणे त्यांनी प्रभाव टाकल्याचंही यात नमूद केलेलं आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. देशमुख हे एक राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती असल्यानं त्यांची सुटका झाल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तसेच देशमुख हे तपासात सहकार्य करत नसल्यानं त्यांना जामीन देऊ नये, असंही ईडीनं म्हटलेलं आहे. याशिवाय देशमुखांपेक्षाही वयानं मोठे असलेले अनेक आरोपी जेलमध्ये आहेत, त्यामुळे वाढत्या वयाचा दाखला देऊन जामीन मागणं चुकीचं असल्याचं ईडीनं स्पष्ट केलं आहे.
भ्रष्टाचारातून मिळवलेल्या बेहिशेबी पैशातून देशमुखांनी कुटुंबातील सदस्यांच्या नावे विविध मालमत्ता तयार केल्या आहेत. त्यांच्याच सूचनेवरून त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे हे पोलीस अधिकाऱ्यांची नावं असलेल्या अधिकृत याद्या पोस्टिंगसाठी अनुकूल आणून देत असत. मुंबई शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील याद्याही तत्कालीन गृहमंत्र्यांच्या कार्यालयात कॅबिनेट मंत्र्याशी सल्लामसलत करूनच तयार करण्यात आल्या होत्या. त्या याद्या पालांडे आणि रवी व्हटकर यांच्यामार्फत पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आल्याचंही यात म्हटलेलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. पीएमएलए न्यायालयाने 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं दिलं आहे. प्रकृता अस्वस्थाचं कारण तसेच वाढतं वय पाहता आपल्याला जामीन देण्याची विनंती देशमुखांकडनं करण्यात आली आहे. अनिल देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळलेला आहे, त्याचसोबत उच्च रक्तदाब आणि विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. याशिवाय त्यांना कोविड 19 ही होऊन गेलाय, या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्यानं त्यांना सतत आधार आणि दुस-याच्या मदतीवर अवलंबून रहावं लागतंय. त्यामुळे मनवतेच्या भावनेनं जामिनावर सोडण्याची विनंती देशमुखांनी हायकोर्टाकडे केली आहे.