ठाणे : जर तुम्ही आमच्या घरावर येणार असाल तर आम्ही पण तुमच्या घरात घुसू. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) शांत बसायचा आदेश आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. आम्हाला डिवचू नका, सुरुवात तुम्ही करणार तर शेवट आम्हाला करावा लागेल, असा इशारा मनसे (MNS) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे बीड दौऱ्यावर असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या ताफ्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्याची घटना घडली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 'एक मराठा, लाख मराठा', अशा घोषणा देत राज ठाकरेंचा ताफा अडवला. या राड्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चांगलाच वाद सुरु आहे. राज ठाकरेंनी सुपारी फेकीच्या घटनेनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना माझ्या नादी लागू नका, असा इशाराच दिला आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचे नेते आणखी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
सुरुवात तुम्ही करणार तर शेवट आम्हाला करावा लागेल : अविनाश जाधव
या वादावरून अविनाश जाधव म्हणाले की, जर तुम्ही आमच्या घरावर येणार असाल तर आम्ही पण तुमच्या घरात घुसू. राज ठाकरेंचा शांत बसायचा आदेश आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. आम्हाला डिवचू नका. पण परत कोण मस्ती केली तर आम्ही गप्प बसणार नाही हेही लक्षात ठेवा. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. आमची तिकडे गरज नाही. तिकडे जर काही झाले तर तिकडचे कार्यकर्ते सक्षम आहेत. राज ठाकरेंवर प्रेम करणारे हजारो वेडे आहेत. सुरुवात तुम्ही करणार तर शेवट आम्हाला करावा लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
तुमच्याकडे प्रस्थापित आहेत तर माझ्याकडे विस्थापित : राज ठाकरे
दरम्यान, राज्यात मनसे पुन्हा एकदा आक्रमक शैलीत परतल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अकोला येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. त्यानंतर, ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ आणि शेण मनसेने फेकले होते. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्यावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना इशारा दिला. माझ्या नादी लागू नका, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही. उद्या माझे मोहोळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत तर माझ्याकडे विस्थापित आहेत, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आता मनसे आणखी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा
मनसेचा राडा... मनसैनिकांनी आता टोलनाका फोडला; गडकरींच्या बालेकिल्ल्यातच खळखट्याक