MNS Raj Thackeray: मुंबई: तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका... मी जे अपत्य जन्माला घातलं आहे 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' तेच मी वाढवणार...मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत, असं मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. राज ठाकरेंनी यावेळी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला.
आज उद्धव ठाकरे , संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात. कारण काय तर मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. मग उद्धव ठाकरे , संजय राऊतांना इतक्याच नरेंद्र मोदींच्या भूमिका पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात का नाही उतरलात. तेव्हा सत्तेचा मलिदा खात राहिलात, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी यावेळी केला. एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही. रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो, असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं.
माझा नरेंद्र मोदींसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा-
2024 ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. मला वाटाघाटीमध्ये पाडू नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी मोठी घोषणा राज ठाकरेंनी यावेळी केली.
येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र कर भरतो. तेवढाच निधी वाट्याला यावा, अशी अपेक्षा आहे. येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे. अनेक निवडणुका येतील. विधानसभा निवडणुका येतील. त्यामध्ये काय होईल? मी इथेच गेल्यावर्षी सभेत महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे, असं सांगितलं होतं. कोणती सोंगटी कुठे पडलीये माहिती नाही. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरीका आहे ना जपान आहे. या तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. 10 वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल. तरुणांकडे मोदींनी लक्ष दिले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray Speech : राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा, पाडवा मेळाव्यात मोठी घोषणा