Chandrapur Lok Sabha Election : आज मांडवसीचा दिवस म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी शेतावरील सालगडी कायम ठेवायचा की बदलायचा, हे ठरवण्याचा दिवस असतो. त्यामुळे वरोरा मतदारसंघात गेल्या 10 वर्षापासून सत्तेत असलेल्या धानोरकरांना बदलायचं की ठेवायचं याचा विचार करा, असं म्हणत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिभा धानोरकरांना (Pratibha Dhanorkar) टोला लगावलाय.


सुधीर मुनगंटीवार आज आपल्या प्रचारार्थ वरोरा तालुक्यात भेटी-गाठी, कॉर्नर सभा आणि छोट्या रैलींच्या माध्यमातून निवडणूक प्रचार करत असताना त्यांनी हे भाष्य केले आहे. माझ्या मतदारसंघात मी केलेले विकासकामे पहा आणि धानोरकर यांनी 10 वर्षात काय विकास केलाय हे बघितल्यास आपल्याला चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे आता  सालगडी बदलवला पाहिजे, असे म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी मतदारांना आपल्याला मतदान करण्यासाठी साद घातली आहे. 


विकासासाठी सालगडी बदलायची वेळ 


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवल्यापासून प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगतान दिसत आहे. सोबतच  2019 मध्ये याच मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी राज्यात एकमेव दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. त्यामुळे अबकी बार चारसो पारचा नारा देणाऱ्या भाजपला या मतदारसंघातून विजय संपादन करणे फार महत्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महाराष्ट्रातील प्रचारचे रणशिंग चंद्रपूरातून फुंकले आहे.


मात्र, असे असले तरी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदारांवर पूर्ण विश्वास दर्शवत, अशा कितीही सभा मोदींनी घेतल्या तरी त्याचा परिणाम निवडणुकांवर होणार नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार मतदारसंघात दौरे, प्रचारसभा आणि भेटी-गाठी घेऊन मतदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या मतदारसंघात मतदार काँग्रेसचा गड राखण्यासाठी प्रतिभा धानोरकर यांना मत देतात, की विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजपला सुधीर मुनगंटीवारांच्या रूपाने कौल देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.   


सुधीर मुनगंटीवार आनंदवनात आमटे कुटुंबियांच्या भेटीला 


विदर्भात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांना आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. या अनुषंगाने चंद्रपुरातील लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघात आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे. परिणामी, आज सुधीर मुनगंटीवार यानी वरोरा येथील आनंदवन प्रकल्पात जाऊन डॉक्टर विकास आमटे यांची भेट घेतलीय. आनंदवन आणि आमटे परिवाराशी असलेले आपले ऋणानुबंध मुनगंटीवारांनी यावेळी उलगडून दाखवले आहे. बाबा आमटे यांची प्रेरणा घेत विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून आपण करत असलेल्या सेवाकार्याची आठवण देखील मुनगंटीवारांनी यावेळी बोलून दाखवली आहे. आज आमटे कुटुंबीयांना भेटून आपल्याला अतिशय आनंद झाला आणि त्यांचा आशीर्वाद लाभला, अशी भावनाही सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना व्यक्त केलीय.


इतर महत्वाच्या बातम्या