नवी दिल्ली: भाजपने महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करुन बराच कालावधी उलटला तरी अद्याप महायुतीच्या अंतिम जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. परंतु, आता येत्या 24 तासांमध्ये महायुतीचे जागावाटप (Mahayuti Seat Sharing) मार्गी लागण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे काहीवेळापूर्वीच दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर भाजप नेतृत्त्वाकडून मंगळवारी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली जाईल. त्यासाठी मंगळवारी शिंदे गट आणि अजितदादा गटाचे नेते दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.


महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या बहुतांश जागांवर एकमत झाले असले तरी तीन ते चार जागांवरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यासाठी मंगळवारी दिल्लीत महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते उद्या दिल्लीत दाखल होतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी संध्याकाळी महायुतीची बैठक होईल. या बैठकीत महायुतीचे जागावाटप अंतिम होण्याची शक्यता आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उद्याच्या बैठकीसाठी मंगळवारी सकाळी दिल्लीत दाखल होतील. महायुतीच्या जागावाटपाच्यादृष्टीने ही बैठक निर्णायक असेल. अमित शाह यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत भाजप जास्त जागा लढवेल, असे स्पष्ट केले होते. अजितदादा गट आणि शिंदे गटापेक्षा भाजपच्या उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे जिंकून येऊ शकणाऱ्या नेत्यालाच उमेदवारी द्यावी, असा अमित शाह यांचा आग्रह आहे. त्यासाठी वेळ पडल्यास शिंदे गट किंवा अजित पवार गटातील नेत्यांना कमळाच्या चिन्हावर उभे करावे, असाही प्रस्ताव भाजपच्या गोटातून मांडण्यात आला होता. परंतु, एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यासाठी राजी नाहीत. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एक अंकी जागांवर समाधान मानण्यासही नकार दिला. अमित शाह यांच्या ठाम भूमिकेनंतरही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी माघार घेतली नव्हती. परिणामी महायुतीच्या जागावाटपचे घोडे अडले होते. परंतु, मंगळवारी अमित शाह यांच्या घरी होणाऱ्या बैठकीत हा सगळा तिढा सुटण्याची शक्यता आहे. 


आणखी वाचा


महायुतीच्या 42 जागांचा तिढा सुटला, 6 जागांवर बोलणी सुरू; शिंदेंच्या 'खऱ्या' शिवसेनेला आणि दादांच्या 'खऱ्या' राष्ट्रवादीला मिळणार इतक्या जागा, मनसेलाही बळ देणार