मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad lad) यांचं बनावट लेटरहेड आणि सही वापरून 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विधान परिषद सभागृहात स्वत: आमदार लाड यांनी ही धक्कादायक माहिती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. रत्नागिरी येथे प्रसाद लाड यांच्या नावाचे खोटे लेटरहेड आणि प्रसाद लाड यांची खोटी सही वापरून बीड (beed) जिल्ह्यात 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. प्रसाद लाड यांच्या आवाजात AI कॉल करून निधी त्वरित वर्ग करा, असं रत्नागिरी (Ratnagiri) येथील अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं. त्यानंतर हा निधी वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी, स्वत: आमदार लाड यांनी सभागृहात माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हा राज्यात गेल्या वर्षभरापासून चर्चेत असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर येथील गुन्हेगारी आणि विविध घोटाळ्यांच्या अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र, आता चक्क आमदार महोदयांच्या नावाचा वापर करुन तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचा घपळा झाल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधूनच समोर आला आहे. याप्रकरणी, 4 जणांची नावे समोर आली असून अधिक तपास सुरू आहे. रत्नागिरी येथील अधिकाऱ्याला याबाबत संशय आल्यावर त्यांनी प्रसाद लाड यांच्या पत्राबाबत आणि कॉलबाबत खात्री करुन घेण्यासाठी फोनवरुन आमदार लाड यांच्याशी संवाद साधला. लाड यांच्यासोबत कॉलवर बोलणे झाल्यानंतर हा धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
एआयचा वापर करत काल मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजता कॉल आला होता. त्या कॉलवरुन निधी संदर्भात बोलले, लेटर हेडवरील सही देखील खोटी केली आहे. माझ्या नावाचा गैरवापर करुन निधी चोरण्याचे काम झाले. याबाबत सायन पोलीस ठाण्यात कळवले असून तक्रार देखील दिल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. तसेच, पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्या कानावर देखील ही घटना घतली आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्याचे नाव समोर आल्यावर अजून सावध झालो, असेही लाड यांनी म्हटले. दरम्यान, याप्रकरणी तपास सुरू असताना नंबर आले आहेत, 4 लोकांची नावे देखील समोर आली असून एकाचं नाव बंडू आहे, तो सरपंच असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकणी, पोलीस माहिती घेऊन कारवाई करतील, असे लाड यांनी सांगितले.
हेही वाचा
नशिब बलवत्तर म्हणून बचावला; सीता नदीत वाहून गेलेला दुचाकीस्वार पाण्यातून बाहेर निघाला