सोलापूर : राज्यातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या लढतींकडे राज्याचे लक्ष लागले असून सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उद्या सोलापूर दौऱ्यावर असून माढा लोकसभा मतदारसंघात त्यांच्या सभा होत आहेत. सोलापुरात माजी मुख्यमंत्र्यांची कन्या प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत आहे. त्यामुळे, या लढतीकडे सर्वच राजकीय पक्ष गंभीरतेने घेत आहेत. आमदार प्रणिती शिंदेनी (Praniti shinde) सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती, तर अद्यापही सभांच्या माध्यमातून भाजपावर हल्लाबोल कर आहेत. मात्र, सभेदरम्यान त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पुलवामा हल्ल्याचा दाखला दिला. आता, याच विधानावरुन प्रणिती शिंदे अडचणीत आल्या आहेत. कारण, भाजपाने निवडणूक आयोगाकडे प्रणिती शिंदेंच्या विधानाची तक्रार केली आहे.


काँग्रेस आमदार आणि सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या अडचणी ऐन निवडणूक काळात वाढल्याचे दिसत आहे. भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. पुलवामा हल्ला प्रकरणी प्रणिती शिंदे यांनी केलेले विधान हे देशद्रोही असून, सैन्याचे मनोधैर्य खचवणारे असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे, निवडणूक आयोग आता काय भूमिका घेणार, कारवाई करणार का,असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 


दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते यांच्यात थेट लढत आहे. दोन दिवसांपूर्वी प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी सोलापुरात काँग्रेस नेते राहुल गांधींची सभा झाली. तर, शरद पवार हेही सोलापूर दौरा करुन सांगलीत पोहोचले आहेत. दुसरीकडे राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही 30 एप्रिल रोजी सोलापुरात येत आहेत. त्यामुळे, येथील दोन्ही उमेदवारांनी दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरवून सोलापूकरांना, मतदारांना आपली ताकद दाखवून दिली आहे.


काय आहे पत्रात


प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात देशद्रोही वक्त्यव्य केले आहे. सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी राजकीय फायद्यासाठी या दुःखद घटनेचा गैरफायदा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. प्रणिती शिंदे यांनी विधान केले की "पुलवामा हल्ला हे केंद्र शासन व मा. पंतप्रधान मोदीजींनी आपल्या जवानांचे रक्त सांडून 'घडले' नसून 'घडवले आहे. काश्मीरमध्ये पुलवामा भागात पाकिस्तानी अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला होता. पुलवामाचा हा हल्ला घडला नाही तर घडविण्यात आला होता. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनीच त्याचा गौप्यस्फोट केला होता." है वक्त्यवं देशाची बदनामी करणारे व 'देशद्रोही वक्तव्य आहे. जे निवडणूक नियमांची तसेच आपल्या देशाच्या सैन्याचे मनोधैर्य खचवणारी आहे, अशा आशयाचे पत्र भाजपाने निवडणूक आयोगाला दिले आहे.